रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका पुन्हा सुरू झाल्यापासून सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. मालिकेत दररोज ज्या घडामोडी घडत आहेत त्यावरून सोशल मीडियावर विविध मीम्स व्हायरल होत आहेत. कुंभकर्णाच्या एपिसोडनंतर त्यावरील बरेच मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये हनुमानाने संजीवनी वनस्पतीचा पर्वत उचलला. यावरून पुन्हा एकदा ट्विटरवर ‘रामायण’ हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला.

युद्धाला तोंड फुटल्यानंतर रावणाचा मुलगा इंद्रजीत याच्या एका बाणाने लक्ष्मणाचा अचूक वेध घेतला. विंध्य पर्वताच्या उत्तरेला हिमालयाच्या उतारावर गंधमादन पर्वतावर मिळणारी संजीवनी वनस्पतीच लक्ष्मणाला वाचवू शकते. ती सूर्योदयापूर्वीच मिळायला हवी आणि हनुमानच ती आणू शकतो. ती आणायला निघालेल्या हनुमानासमोर अनेक आव्हानं आली. नेमकी कोणती वनस्पती हे समजेना म्हणून तो आपला आकार वाढवून सगळा पर्वतच उचलून घेऊन निघतो. हे दृश्य जेव्हा टीव्हीवर दाखवण्यात आलं, तेव्हा त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर पोस्ट केले गेले.

या दृश्यावरून काहींनी पुन्हा एकदा सोनाक्षी सिन्हाची फिरकी घेतली. सोनाक्षीने हा एपिसोड पाहावा असं नेटकऱ्याने म्हटलं. ‘रामायण’ मालिका पुन्हा सुरू झाल्यापासून टीआरपीचे नवीन विक्रम रचले गेले. लॉकडाउनच्या काळात पुन्हा एकदा या मालिकेची लोकप्रियता वाढली आहे.