पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका पुन्हा दाखवण्याची मागणी करण्यात आली. प्रेक्षकांच्या या मागणीनुसार या मालिका पुन्हा दाखवण्यात आल्या. पण आता रामायण ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे दिसत आहे. नुकताच रामायणात श्री रामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी ३३ वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे.

नुकताच अरुण गोविल यांचे ट्विटर अकाऊंट अधिकृत झाले आहे. त्या निमित्ताने त्यांनी ३३ वर्षांपूर्वीचा रामायण मालिकेच्या संपूर्ण टीमचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये रामानंद सागर यांच्यासोबत रामायणातील सर्व पात्र दिसत आहेत. ‘रामानंद सागर यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे चित्रपटसृष्टीमधील सर्वात प्रतिभावान आणि भाग्यवान कलाकार’ असे त्यांनी फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.

करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन करण्यात आले आहे. या काळात सोशल मीडियावर लोकांकडून ८० च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय रामायण मालिका सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा रामायण मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. ही मालिका ऑन-एअर होताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले. ८० आणि ९० च्या दशकातील ‘रामायण’, ‘ब्योमकेश बक्षी’ आणि ‘शक्तीमान’ या मालिकांचे पुन:प्रक्षेपण सुरू झाल्याने डीडी वाहिनी सर्वाधिक पाहिली गेलेली वाहिनी ठरली आहे.