करोना संकटाने देशात हाहाकार उडवलेला असताना आता आणखी एक चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. हरिद्वारमध्ये होत असलेल्या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे. दरम्यान बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी कुंभमेळ्यातील गर्दी पाहून नाराजी व्यक्त केली आहे.

राम गोपाल वर्मा यांनी ट्विटर अकाऊंटवर कुंभमेळ्यातील अफाट गर्दीचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्यांनी ‘तुम्ही पाहात असलेला कुंभमेळा नाही तर करोना अ‍ॅटम बॉम्ब आहे… मला आश्चर्य वाटते की या एक्सप्लोजरचा दोष कोणाला द्यायचा’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. अनेकांनी यावर कमेंट करत संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा : कुंभमेळ्यातील अफाट गर्दी पाहून संतापली अभिनेत्री, म्हणाली…

देशात करोनाची दुसरी लाट आलेली असतानाच हरिद्वारमध्ये कुंभमेळा होत असून, प्रचंड गर्दीत करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासनाची त्रेधातिरिपट उडत आहे. कुंभमेळ्यातील सोमवारी शाहीस्नान पार पडले. गंगेतील दुसऱ्या पवित्र स्नानाची पर्वणी साधण्यासाठी हरिद्वारमध्ये तब्बल २८ लाख साधू आणि भाविक दाखल झाले होते.

ना मास्क, ना थर्मल स्क्रिनिंग

इंडियन एक्स्प्रेसनं कुंभमेळा सुरू असलेल्या परिसरात करोना नियमांच्या पालनाबद्दलची पाहणी केली. तेव्हा तिथे कुठेही मास्कची सक्ती करताना आढळून आलं नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केलं जात नसल्याचं दिसलं. महत्त्वाचं म्हणजे कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. मात्र, विविध तपासणी नाक्यांवर केलेल्या पाहणी रिपोर्ट न आणलेल्यांनाही परवानगी देण्यात आल्याचं दिसून आलं.

उत्तराखंडमध्ये रुग्णवाढ

इतर राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्येही रुग्णवाढ होताना दिसत आहे. राज्यात २ हजार ५६ रुग्ण उपचार घेत असून, शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला ३८६ नवीन रुग्ण आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुंभमेळ्यात आढळून आलेल्या करोना पॉझिटिव्ह भाविकांमुळे राज्य सरकारबरोबर केंद्राचीही चिंता वाढली आहे. पहिल्या शाहीस्नानाला ३२ लाख भाविक हरिद्वारमध्ये दाखल झाले होते. तर तिसरं शाहीस्नान बुधवारी होणार आहे.