सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानला रवाना झालेली ही जोडी गुपचूपपणे साखरपुडा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये या दोघांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र, या सगळ्या चर्चांना रणबीरचे काका अभिनेता रणधीर कपूर यांनी पूर्णविराम दिला आहे. रणबीर आलियाच्या साखरपुड्याच्या केवळ अफवा आहेत असं त्यांनी म्हटल्याचं ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.
“ज्या चर्चा रंगत आहेत त्यात अजिबात तथ्य नाही. जर आज रणबीर आणि आलियाचा साखरपुडा असता तर आमचं सगळं कुटुंब त्यांच्यासोबत असतं. रणबीर, आलिया आणि नीतू कपूर हे केवळ तेथे सुट्टीसाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठीच गेले आहेत. त्यांच्या साखरपुड्याच्या चर्चा या निव्वळ चुकीच्या आहेत. अफवा आहेत”, असं रणधीर कपूर यांनी स्पष्ट केलं आहे.
View this post on Instagram
आणखी वाचा- … तर आतापर्यंत आलियाशी लग्न केलं असतं- रणबीर कपूर
दरम्यान, नवीन वर्षाचं स्वागत एकत्र करण्यासाठी आलिया, रणबीर आणि नीतू कपूर हे राजस्थानला गेले आहेत. त्यांच्या पाठोपाठ रणवीर सिंग व दीपिका पदुकोणदेखील गेले आहेत. यावेळचे काही फोटो नीतू कपूर यांनी इन्स्टा स्टोरीमध्ये शेअर केला आणि त्यावरून हे सर्वजण एकत्र असल्याचं स्पष्ट झालं. विशेष म्हणजे रणथंबोरमध्ये रणबीर-आलिया गुपचूप साखरपुडा करणार असल्याचीही जोरदार चर्चा रंगली होती. मात्र, ही अफवा असल्याचं रणधीर कपूर यांनी स्पष्ट केलं आहे.