चित्रपटसृष्टीत अनेकदा भावनांना बाजूला सारत कॅमेरासमोर कलाकारांना एक वेगळा चेहरा दाखवावा लागतो. प्रेक्षकांसमोर सादर होताना किंवा कॅमेरासमोर येताना एकमेकांबद्दलचा वैयक्तिक द्वेष विसरावा लागतो. रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांना आपल्या आगामी ‘जग्गा जासूस’ चित्रपटाचे प्रमोशन करताना हेच जमले नाही असे दिसतेय. प्रमोशनमधील अनेक कार्यक्रमांमध्ये दोघांची उत्तरं, एकमेकांबद्दलची मतं आणि न जमलेली केमिस्ट्री यामुळे आता प्रेक्षकांमध्येच संभ्रम निर्माण झालाय.

प्रेक्षकवर्ग चित्रपटाच्या यशासाठी किती महत्त्वाचा असतो हे माहित असतानाही दोघेही प्रेक्षकांना आपली कमाल दाखवण्यात अयशस्वी झाले आहेत. किंबहुना प्रमोशनसाठी दोघांना एकत्र येण्याची जणू कोणी जबरदस्तीच केली असल्याचे चित्र दिसते. दोघांचा जरी ब्रेक अप झाला असला तरी किमान एकमेकांमधील मैत्री तरी प्रेक्षकांसमोर योग्यरित्या आणणे अपेक्षित होते. मात्र तसेही झाले नाही. अनेकदा मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकांबद्दल मिश्किलपणे उत्तरे देत अप्रत्यक्षपणे टीका करण्याची संधी सोडली नाही. त्यामुळे चित्रपटातील दोघांच्या केमिस्ट्रीबाबत प्रेक्षकांमध्ये आता संभ्रम निर्माण झाला आहे. दोघांच्या नात्यांमधील या दुराव्याचा फटका चित्रपटाला आधीसुद्धा बसला. तीन वर्षांपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखच निश्चित होऊ शकली नव्हती. त्यानंतर सुरुवातीला कतरिनाला रणबीरसोबत प्रमोशन करायचे नव्हते. चित्रपटासाठी केलेली मेहनत प्रेक्षकांसमोर मांडण्यात आता दोघेही अयशस्वी झाल्याचे चित्र दिसते.

याउलट, रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणबद्दल बोलायचे झाल्यास ब्रेकअपनंतरही दोघेही प्रेक्षकांसमोर सकारात्मक दिसले. जवळपास दोन वर्षांपर्यंत दोघांचे अफेअर चालले होते. ब्रेकअपनंतर दोघांनी मिळून ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘तमाशा’ चित्रपटात काम केले आणि ब्रेकअपनंतरही प्रमोशनदरम्यान दोघांमधील केमिस्ट्री जबरदस्त होती. ही केमिस्ट्रीच रणबीर आणि कतरिनाच्या नातेसंबंधामध्ये दुरावा आणण्याचे एक कारण असल्याचे म्हटले जाते. मात्र रणबीर आणि दीपिका तेव्हा प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाले होते. ‘तमाशा’ चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान दीपिका रणवीर सिंगला डेट करत होती. त्यावेळी दीपिकाने रणबीर कपूर अजूनही चांगला मित्र असल्याचे स्पष्ट केले होते आणि हेच मैत्रीपूर्ण नाते दोघांनी प्रेक्षकांसमोर चांगल्याप्रकारे मांडले.

वाचा : घराणेशाहीचा विरोध करणारी कंगनाच बनली एका अभिनेत्रीसाठी ‘गॉडफादर’

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रणबीर आणि कतरिनासुद्धा ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनदरम्यान मैत्रीपूर्ण वागले असते तर नक्कीच चित्रपटासाठीसुद्धा हे फायद्याचे ठरले असते. त्यामुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.