रणबीर कपूर आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेल्या ‘जग्गा जासूस’मधील दुसरं गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘गलती से मिस्टेक’ या गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केले असून अरिजीत सिंग आणि अमित मिश्रा यांनी हे गाणे गायले आहे. गाण्याच्या सुरुवातीला थोड्या वेळासाठी कतरिना दिसते मात्र त्यानंतर संपूर्ण गाण्यात रणबीरचीच अनोखी नृत्यशैली आणि हटके हावभाव पाहायला मिळतात. रणबीर यात महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या भूमिकेत हॉस्टेलच्या खानावळमध्ये नाचताना दिसत आहे.

याआधी चित्रपटातील ‘उल्लू का पठ्ठा’ या गाण्याच्या मेकिंगदरम्यानचा व्हिडिओ कतरिनाने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता ज्यामध्ये कतरिना आपल्या एक्स बॉयफ्रेंडची गंमत करत स्वत: त्याग करून रणबीरला चमकण्याची संधी दिली असं म्हणताना दिसतेय. याचं उत्तर रणबीरने ‘गलती से मिस्टेक’ गाण्याचं टीझर प्रदर्शित करून दिलं होतं.

कतरिना रणबीरसोबत मिळून ‘जग्गा जासूस’चे प्रमोशन करणार नसल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी होती. मात्र आता तिने सर्व गोष्टी बाजूला सारत चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. प्रमोशनसाठी दोघेही एकत्र मुलाखती आणि अनेक शहरांची भ्रमंतीसुद्धा करणार आहेत. त्यामुळे रणबीर आणि कतरिनाच्या चाहत्यांसाठी ही एक चांगली बातमी ठरणार आहे.

वाचा : सोशल मीडियावरील टीकांना दीपिकाचं सडेतोड उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जग्गा जासूस’ हा चित्रपट सुरुवातीपासून अनेक कारणांसाठी चर्चेत राहिला आहे. त्यापैकीच एक कारण म्हणजे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख. आतापर्यंत जग्गा जासूसच्या प्रदर्शनाच्या अनेक तारखा बदलण्यात आल्या. पण अखेरीस अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा १४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. कतरिनाचा ‘टायगर जिंदा है’ हा सिनेमाही यावर्षी प्रदर्शित होणार आहे त्यासाठी सध्या ती सलमान खानसोबत शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर दुसऱ्या बाजूला रणबीर कपूर संजय दत्तच्या जीवनावर आधारित बायोपिकची शूटिंग करत आहे.