रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘संजू’ हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत आहे. चार आठवडे उलटूनही राजकुमार हिरानींचा हा चित्रपट प्रेक्षकांवर जादू कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित हा बायोपिक आता बॉक्स ऑफीसवर नवे विक्रम करण्यास सज्ज झाला आहे. कमाईचा वाढता आकडा पाहता रणबीरचा ‘संजू’ सलमानच्या ‘टायगर जिंदा है’ला लवकरच मागे टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रदर्शनाच्या २५व्या दिवशी ‘संजू’ची एकूण कमाई ३३३.५५ कोटी रुपये इतकी झाली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाने एकूण ३३९.१६ कोटींचा गल्ला जमवला होता. त्यामुळे ‘संजू’च्या कमाईत जवळपास सहा कोटींती भर पडल्यास तो सलमानलाही मागे टाकणार. असं झाल्यास रणबीरच्या करिअरमधला हा सर्वांत यशस्वी चित्रपट मानला जाईल.

सलमान आणि रणबीरमधलं ऑफस्क्रीन वैर अनेकांनाच ठाऊक आहे. आता चित्रपटांच्या माध्यमातून या दोघांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे असं म्हणायला हरकत नाही. ‘संजू’ हा रणबीरच्या करिअरमधला महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला असून ‘टायगर जिंदा है’च्या कमाईचा रेकॉर्ड तो मोडणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ‘संजू’नं ‘रेस ३’ आणि ‘पद्मावत’लाही कमाईच्या बाबतीत मागे टाकलं आहे.