सध्या बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याचा आगामी सिनेमा ‘जग्गा जासूस’च्या प्रमोशनमध्ये फारच व्यग्र आहे. या सिनेमाचा तो निर्माता असल्यामुळे सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो प्रयत्नशील आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तो फवाद खानचा फार मोठा चाहता असल्याचे त्याने स्पष्ट केले.

कपिल शर्माची अशीही सामाजिक कामगिरी

‘आपण फवाद खानचे प्रशंसक असून, ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमाच्या प्रदर्शनादरम्यान त्याला निरर्थकपणे वादात ओढण्यात आलं याचं फार वाईट वाटतं, असं मत रणबीरने व्यक्त केलं. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानने सोनम कपूरसोबत ‘खुबसूरत’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. पाकिस्तान सिनेसृष्टीत तसेच टिव्ही जगतात फवाद हे एक मोठं नाव आहे. जेव्हा त्याचा ‘खुबसूरत’ सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा त्याचे भारतातही लाखो चाहते झाले होते. त्याच्या लूकवर आजही अनेक तरुणी फिदा आहेत.

फवादने ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. चित्रपटाच्या प्रदर्नाच्या आधी उरी हल्ला झाल्यामुळे भारत- पाकिस्तान यांच्यातले संबंध अजून विकोपाला गेले होते. याचा सर्वात मोठा फटका हिंदी सिनेमांना पडला होता. भारतीय सिनेमांमध्ये काम करण्यास पाकिस्तानी कलाकारांना बंदी घालण्यात आली होती. अनेक राजकीय पक्षांनी या सिनेमाला कडाडून विरोध केला होता. अखेर या वादानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांना भारत सोडून पाकिस्तानात जावं लागलं होतं.

रणबीर कपूरने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ‘मी फवाद खानचा मोठा चाहता आहे. तो एक चांगला अभिनेता आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ सिनेमातील त्याची भूमिका अत्यंत महत्वाची आणि प्रभाव पाडणारी होती. छोटी भूमिका असतानाही त्याने ती करण्याची तयारी दर्शवली होती हीच मोठी बाब आहे.’

Priyanka Chopra: बॉलिवूडच्या देसी गर्लचा आजवरचा प्रवास

‘राजकीय आंदोलनाची झळ फवाद खानला सोसावी लागणं हे दुर्देवी आहे. पण तो एक असा व्यक्ती आहे ज्याच्याकडे पाहून मी शिकण्याचा प्रयत्न करतो. एक मित्र म्हणूनही माझं त्याच्याशी चांगलं जुळतं. त्याच्यासोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करायला मला आवडेल. माझे आई, वडिलदेखील फवादचे चाहते आहेत. माझी आई त्याचे टिव्ही शोदेखील पाहते. त्याचं ‘कपूर अॅण्ड सन्स’ सिनेमातील काम मला आवडलं होतं,’ असं रणबीरने सांगितलं. ‘ऐ दिल है मुश्किल’ हा रणबीर आणि करण जोहरचा पहिलाच सिनेमा होता. पुन्हा करणसोबत काम करायला आपल्याला आवडेल अशी प्रतिक्रियाही रणबीरने दिली.

अनुराग बासू दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ हा सिनेमा येत्या १४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रणबीर पहिल्यांदाच एका शाळकरी मुलाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची पूर्वाश्रमीची प्रेयसी कतरिना कैफही या सिनेमात महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.