बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जीने चित्रपट निर्माता आदित्य चोप्रासोबत २०१४ मध्ये लग्न केलं आणि २०१५ मध्ये तिने मुलगी आदिराला जन्म दिला. जन्माच्या एक वर्षानंतर आदिरा मीडियासमोर दिसली होती. राणी मुखर्जीला माध्यमांची सवय आहे. मात्र, तिचा पती आणि निर्माता, दिग्दर्शक आदित्य चोप्रा नेहमीच माध्यमांसमोर येणं टाळतो. हेच कारण आहे ज्यामुळे इतर सेलिब्रिटींच्या मुलांसारखं आदिरालासुद्धा माध्यमांसमोर आणले गेले नाही. इंटरनेटवरही आदिराचे मोजकेच फोटो आपल्याला पाहायला मिळतात. मात्र बहुधा आता राणी मुखर्जी आपल्या मुलीला मीडियापासून लपवू पाहात नाही असेच दिसत आहे.
बुधवारी रात्री राणी मुखर्जीला मुंबई एअरपोर्टवर पाहिलं गेलं. राणीसोबत तिची मुलगी आदिरासुद्धा होती. गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये आदिरा अत्यंत गोंडस दिसत होती. ही अशी पहिलीच वेळ आहे जेव्हा राणीने आदिराला कॅमेरांपासून लपवलं नाही. काल रात्री उशिरा आईलेकाची जोडी दुबईला रवाना झाली.
वाचा : रमजानमध्ये स्विमसूट घालून फोटोशूट केल्याने ‘दंगल गर्ल’ फातिमावर टीका
आपल्या ३९ व्या वाढदिवशी (२१ मार्च) राणी मुखर्जीने पहिल्यांदा फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी सोशल मीडियावरील अनुपस्थितीबाबत विचारले असता, ‘मी सोशल मीडियावर नाही आणि माझे आदिरासोबतचे फोटोसुद्धा मी सोशल मीडियावर टाकत नाही. आदित्य खूप अंतर्मुख आहे आणि मी या गोष्टीचा सन्मान करते.’ असे उत्तर राणीने दिले होते.
राणी मुखर्जी २०१४ मध्ये ‘मर्दानी’ या चित्रपटात भूमिका साकारताना दिसली होती. त्यानंतर आदिराच्या संगोपनासाठी तिने मोठा ब्रेक घेतला. आता सिद्धार्थ मल्होत्रा दिग्दर्शित ‘हिचकी’ या चित्रपटातून राणी पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे.