सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे संपूर्ण आयुष्य बदलेल्या गायिका म्हणजे रानू मंडल. त्यांनी बॉलिवूड अभिनेता, गायक हिमेश रेशमियाच्या आगामी चित्रपटात ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले. या गाण्यानंतर रानू यांची बॉलिवूडमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तसेच या गाण्यातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावरही जादू केली. ‘तेरी मेरी कहानी’ गाणे सुपरहिट झाल्यानंतर रानू पुन्हा त्यांचे आगमी गाणे, ‘आदत’ने लोकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी जोरदार तयारी करत होत्या.

नुकताच रानू यांच्या ‘आदत’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीला उतरला असून तो आता पर्यंत ७७ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. खुद्द हिमेश रेशमीयाने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. दरम्यान हिमेशने रानू यांचा आवाज खूप मधूर असल्याचे म्हटले आहे. ‘आदत गाण्याच्या रेकॉर्डींग दरम्यान मला जाणवले की रानू मंडल या वन सॉंग वंडर नाहीत. जेव्हा तुम्ही आदत हे गाणे ऐकाल तेव्हा तुमचा माझ्या बोलण्यावर विश्वास बसेल. त्यांचा आवाज खूप मधूर आणि अष्टपैलू आहे आणि ही एक महान प्रतिभा आहे’ असे हेमिशने कॅप्शन दिले आहे.

‘आदत’ या गाण्यानंतर रानू मंडल हिमेशचे ‘आशिकी में तेरी..’ हे गाणे गाणार आहेत. यापूर्वी रानू यांचे ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे लोकप्रिय झाल्याचे पाहायला मिळाले होते. रेल्वे स्टेशनवर गाणे म्हणणाऱ्या रानू यांचे व्हायरल झालेले गाणे ऐकून हिमेशने त्यांना त्याच्या आगामी चित्रपटात गाण्याची संधी दिली आणि रानू रातोरात स्टार झाल्या. या पहिल्या गाण्यासाठी हिमेशने रानू यांना जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे मानधन दिले आहे.