बॉलिवूडमधलं सर्वाधिक लोकप्रिय जोडपं दीपिका- रणवीर १४ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या विवाहाकडे सर्वांचच लक्ष लागून आहे. इटलीत पारंपरिक कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं हा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. तर मुंबईत २८ नोव्हेंबरला जंगी रिसेप्शन पार्टीचं आयोजन बॉलिवूडसाठी करण्यात आलं आहे.

या रिसेप्शनपार्टीसाठी बॉलिवूड, क्रीडा, राजकारण अशा विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित राहणार आहे. या उपस्थितांना दीपिका आणि रणवीरनं आहेर न आणण्याची विनंती केली आहे. लग्नातला आहेर हा ‘द लिव्ह, लव, लाफ फाऊंडेशन’ला दान करावा अशी विनंती दोघांनी केली आहे. अशा प्रकारची सूचनाच त्यांनी आपल्या आमंत्रण पत्रिकेवर छापली आहे.

लग्नातल्या मेन्यूसाठी दीप-वीरचा शेफसोबत हा आहे खास करार

दीपिकानं २०१५ मध्ये ‘द लिव्ह, लव, लाफ फाऊंडेशन’ या सामाजिक संस्थेची स्थापना केली होती. मानसिक स्वस्थाविषयी जनजागृती करण्याचं काम या संस्थेद्वारे केलं जातं. दीपिका काही वर्षांपूर्वी स्वत: मानसिक तणावाची शिकार झाली होती. यातून योग्य उपचार घेऊन ती बरी झाली. त्यानंतर तणावाला बळी पडलेल्या प्रत्येकासाठी तिनं या संस्थेची स्थापना केली. त्यामुळे लग्नातला आहेर हा या संस्थेला दान करावा अशी विनंती दोघांनी केली आहे.