अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. रणवीरने ट्विटरच्या माध्यमातून लग्नाची घोषणा केली आहे. येत्या १४ आणि १५ नोव्हेंबरला हा विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती रणवीरने ट्विटरवर दिली आहे.
‘तुम्हाला कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की कुटुंबीयांच्या आशीर्वादाने १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी आमचं लग्न ठरलं आहे. इतक्या वर्षांत तुम्ही आम्हाला जे प्रेम दिलं त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत. प्रेम, मैत्री आणि विश्वासाच्या आधारावर आमचा जो पुढील प्रवास सुरू होणार आहे त्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे.. दीपिका आणि रणवीर,’ अशी पोस्ट रणवीरने ट्विटरवर लिहिली आहे.
— Ranveer Singh (@RanveerOfficial) October 21, 2018
या वर्षाच्या सुरुवातीपासूनच रणवीर- दीपिकाच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. हे दोघं १० नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधणार असल्याचं वृत्त ‘फिल्मफेअर’ने प्रसिद्ध केलं होतं. पण आता रणवीर आणि दीपिका या दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाच्या तारखेची घोषणा केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सध्या #DeepVeer हा हॅशटॅग जोरदार ट्रेण्ड होत आहे. लग्नाची तारीख ठरवण्यासाठीच रणवीर आणि दीपिकाने सर्वाधिक वेळ घेतला. आपल्या लग्नात सर्व गोष्टींचं नियोजन अगदी सुरेख पद्धतीने व्हावं असाच त्यांचा अट्टहास आहे.
बॉलिवूडच्या या ‘बाजीराव- मस्तानी’च्या लग्नसोहळ्याविषयी आता चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. डेस्टिनेशन वेडिंगच्या थाटात हा विवाहसोहळा पार पडेल ज्यानंतर बंगळुरु आणि मुंबईत त्यांच्या लग्नाच्या निमित्ताने जंगी पार्टीचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही कळत आहे.