अभिनेता रणवीर सिंग याचा आज वाढदिवस असून, ‘गुगल’ने बॉलीवूडच्या या ‘बाजीराव’ला अनोखं ‘बर्थ डे गिफ्ट’ दिलं आहे. ‘गुगल’ने रणवीरने आजवर चित्रपटात साकारलेल्या व्यक्तीरेखांची नावं असलेला स्लाईड शो तयार केला आहे. ‘स्लाईड शो’च्या माध्यमातून ‘गुगल’ने रणवीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
‘बँड बाजा बारात’ चित्रपटातून रणवीरने २०१० साली बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. चित्रपटात रणवीर आणि अनुष्काच्या जोडीला चांगली पसंती मिळाली होती. त्यानंतर रणवीरने बॉलीवूडमध्ये दमदार अभिनयाने आपली वेगळी छाप पाडली. अभिनेत्री दीपिका पदुकोणसोबतचा ‘रामलीला’ चित्रपट रणवीरच्या करिअरमधील लक्षवेधी चित्रपट ठरला. या चित्रपटातील भूमिकेसाठी रणवीरला अनेक पुरस्कार देखील मिळाले. यापाठोपाठ बाजीराव मस्तानी चित्रपट देखील रणवीरसाठी मैलाचा दगड ठरला. ‘बाजीराव’ रणवीरला फिल्म फेअर पुरस्काराने गौरविण्यात आले. रणवीर आणि दीपिकाचे प्रेमप्रकरण देखील जगजाहीर आहे. रणवीरने दीपिकासोबत केलेले सर्वच चित्रपट बॉलीवूड ब्लॉकबस्टर ठरले आहेत. उत्साही व्यक्तीमत्त्व, अभिनयातील तळमळ आणि लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या बॉलीवूडच्या या ‘बाजीराव’ने आज वयाशी तिशी गाठली. त्यानिमित्ताने रणवीरच्या ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातील बिट्टू शर्मा, ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ चित्रपटातील रिकी बहल आणि बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील पेशवा बाजीराव, अशा काही चित्रपटांतील नावांची स्लाईड गुगलने केली.