अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. रणवीर प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय मिळवूनच देतो. या व्यतिरिक्त रणवीर त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमुळेदेखील नेहमी चर्चेत असतो. त्याची ड्रेसिंग स्टाईल ही बॉलिवूडमधील इतर कलारांपेक्षा अतिशय हटके असते. त्याच्या या ड्रेसिंग सेन्समुळे अनेकदा तो ट्रोलही झाला आहे. आतादेखील असेच काहीसे घडले आहे.
नुकताच रणवीर सिंगचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो रणवीर त्याच्या डबिंग स्टूडियोमधून बाहेर पडतानाचा आहे. या फोटोमध्ये रणवीरने लाल रंगाचा हुडी परिधान केला आहे. अनेकांना असे वाटेल की रणवीर तर नेहमीच हूडी परिधान करतो. पण हा हूडी थोडा हटके आहे. हा हूडी रणवीरच्या पायापर्यंत आला आहे. या हूडीवर त्याने हिरव्या रंगाचे शूज आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली आहे. त्याचा हा हटके लूक चाहत्यांच्या पसंतीला फारसा उतरला नसल्याचे दिसत आहे.
नेटकऱ्यांनी तू कार्टून दिसत आहेस, सर्वांत मोठा जोकर आला पाहा अशा कमेंट देत रणवीरची खिल्ली उडवली आहे.
सध्या रणवीर त्याचा आगमी चित्रपट ’83’ च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. २५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.