अॅक्शन, रोमान्स, मसाला आणि फुल्ल ऑन एण्टरटेन्मेंट अशा शब्दांत दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या चित्रपटांचं वर्णन करता येऊ शकतं. असाच एक चित्रपट तो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. बॉलिवूडचा बाजीराव अर्थात रणवीर सिंग आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेत. ‘सिम्बा’ असं या चित्रपटाचं नाव असून यातील रणवीरचा लूक प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा होत आहे. आता या चित्रपटातील एका धमाकेदार गाण्याची झलक रणवीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

एक व्हिडिओ रणवीरने ट्विटरवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये बॅकग्राऊंड डान्सर्स तयारी करताना दिसत आहेत. ‘माझ्या करिअरमधील सर्वांत अफलातून गाणं..’ असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे. गाण्याच्या शूटसाठी सुरू असलेली तयारी आणि सेट पाहता रोहित शेट्टी आणखी एक नवीन धमाकेदार गाणं बॉलिवूडला देणार आहे असं म्हणायला हरकत नाही.

‘देखो, देखो यहाँ क्या हो रहा है, मेरी लाइफ का सबसे बडा गाना शूट हो रहा है. देखो, इतने लोग, इतना ताम-झाम की सर चकरा जाए,’ असं या व्हिडिओत रणवीर म्हणताना दिसतोय. त्यानंतर रोहित शेट्टी येऊन त्याला मिठी मारतो. ‘तुझ्यावर खूप पैसा खर्च करत आहे मी,’ असं रोहित यात म्हणतो आणि त्याचा प्रत्यय गाण्यासाठी सुरू असलेली तयारी पाहून येतो. या गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य करत आहे आणि ‘आला रे आला, सिम्बा आला,’ असं म्हणताना तेसुद्धा या व्हिडिओत पाहायला मिळतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टेम्पर’ या तेलुगू चित्रपटाचा ‘सिम्बा’ हा रिमेक आहे. यामध्ये रणवीर संग्राम भालेराव या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. सध्या हैदराबादमध्ये याचं शूटिंग सुरू असून २८ डिसेंबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.