संजय लीला भन्साळींच्या ‘पद्मावती’ या चित्रपटात अल्लाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारत अभिनेता रणवीर सिंगने प्रेक्षक-समीक्षकांची दाद मिळवली. आपल्या दमदार अभिनयाने तो प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांवर एक वेगळी छाप सोडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. सध्या तो आगामी ‘गली बॉय’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नुकतीच या चित्रपटाची शूटिंग मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकावर पार पडली.

झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे. एका दृश्याच्या शूटिंगसाठी चर्चगेट रेल्वे स्थानकावर रविवारी चित्रपटाची संपूर्ण टीम पोहोचली होती. या दृश्यात गर्दीच्या लोकलमध्ये रणवीरला चढायचे होते. ती गर्दी दाखवण्यासाठी सोबत ५० ज्युनिअर आर्टिस्टदेखील होते.

वाचा : ‘टी सीरिज’सोबत अक्षय पुन्हा कधीच काम करणार नाही?

काही दिवसांपूर्वी रणवीरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटातील त्याचा लूक चाहत्यांसोबत शेअर केला होता. या फोटोमध्ये रणवीरला ‘पद्मावत’मधील अलाउद्दीन खिल्जीपासून ‘गली बॉय’तील भूमिकेसाठी शरीरयष्टीत करावा लागलेला बदल सहज पाहायला मिळत होता. आलिया आणि रणवीर या दोन्ही कलाकारांचा उत्साह आणि एकंदर त्यांच्या अभिनयाची शैली पाहता त्यांच्या भूमिका हे दोघेही चांगलीच वठवतील यात शंका नाही.