‘सिम्बा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता रणवीर सिंग लवकरच झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मालिकेमध्ये येणार आहे. झी मराठीच्या फेसबुकपेजवरून एक व्हिडीओ पोस्ट करत या संदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

झी मराठीने पोस्ट केलेल्या दोन व्हिडीओंपैकी पहिल्या व्हिडीओमध्ये रणवीर ‘रामलीला’ सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत तो ‘पद्मावत’ सिनेमातील हबीबी आणि ‘सिम्बा’ सिनेमातील गाण्यावर नाचताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये ‘लवकरच भेटूया सिंबाला थुकरटवाडीत’ असं लिहीण्यात आलं आहे. त्यामुळे लवकरच रणवीरसहीत सिनेमाची संपूर्ण टीम ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर दिसू शकते. ‘सिम्बा’ हा सिनेमा २८ डिसेंबर रोजी २०१८ प्रदर्शित होत असल्याने या वर्षीच्या शेवटच्या आठवड्यात चला हवा येऊ द्यामध्ये रणवीर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‘रामलीला’ सिनेमातील गाण्यावर नाचताना

‘पद्मावत’ सिनेमातील हबीबी आणि ‘सिम्बा’ सिनेमातील गाण्यावर नाचताना

रणवीर सिंग अतिउत्साह, सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहणं, खोडकर स्वभाव अनेकांना भावतो. रणवीरचा बिधास्तपणा त्याला नेहमीच इतरांपेक्षा वेगळं ठरवतो. एखादी गोष्ट मनात आली की लोक काय म्हणतील याचा विचार करण्याऱ्यांपैकी रणवीर नाही. त्यामुळेच आता तो चला हवा येऊ द्याच्या मंचावर काय काय धम्माल करतो याकडे मराठी प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. ‘सिम्बा’ सिनेमामध्ये मराठमोळ्या सिद्धार्थ जाधवचीही महत्वाची भूमिका असल्याने या कार्यक्रमामध्ये तोही सहभागी असल्याचे बोलले जात आहे. मात्र हा कार्यक्रम कधी प्रदर्शित होणार असून कोणकोणते कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत याबद्दलची माहिती अद्याप झी मराठी वाहिनीने दिलेले नाही.

या आधी आलेले बडे स्टार्स

चला हवा येऊ द्या मध्ये बॉलिवूडमधील मोठे कलाकार येण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही थुकरटवाडीमध्ये शाहरुख खान, सलमान खान, जॉन अब्राहम, अक्षय कुमार, इरफान खान, अजय देवगण, रितेश देशमुख यासारख्या मंडळींने हजेरी लावली आहे. या यादीमध्ये आता रणवीरचाही समावेश होणार आहे.