बॉलिवूडची बहुचर्चित जोडी रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. गेल्या सहा वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. नात्याच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी दीपिकाने तिच्या भूतकाळातील नात्यांनाही न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत दीपिका आणि रणवीरनेही मैत्रीचं नातं कायम ठेवलं आहे. इतकंच नव्हे तर दीपिकाने भविष्यात रणबीरसोबत काम करण्याचीही तयारी दाखवली आहे. रणबीरसोबत स्क्रिन शेअर करण्याची इच्छा रणवीरचीही आहे आणि हीच इच्छा त्याने ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये बोलून दाखवली.
‘कॉफी विथ करण’ या लोकप्रिय चॅट शोचा सहावा सिझन नुकताच सुरू झाला आहे. पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका आणि आलिया भट्ट नंतर दुसऱ्या एपिसोडमध्ये रणवीरने अक्षय कुमारसोबत हजेरी लावली. कोणत्या कलाकारांसोबत काम करणं तुला आवडतं असा प्रश्न सूत्रसंचालक करण जोहरने रणवीरला विचारला असता त्याने दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट या दोघींची नावं सांगितली. या दोघींसोबत कोणत्या चित्रपटात काम करायला आवडेल असा प्रश्न करणने पुढे विचारला. तेव्हा रणवीरने करण जोहरच्याच ‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वलमध्ये काम करायला आवडणार असल्याचं सांगितलं. त्याचसोबत या सिक्वलमध्ये रणबीर कपूरने सलमान खानची भूमिका साकारवी अशीही इच्छा त्याने व्यक्त केली.
वाचा : बाळासाहेब ठाकरेंच्या बायोपिकचा सिक्वलसुद्धा येणार
‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाला नुकतीच २० वर्षे पूर्ण झाली. हा चित्रपट अजूनही अनेकांच्या आवडीचा आहे. विशेष म्हणजे एका रेडिओ शोमध्ये करणने सिक्वलमध्ये आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि जान्हवी कपूरला घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता रणवीरच्या या आग्रहानंतर तरी करण जोहर ‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वलचा विचार करणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.