करोना विषाणूने संपूर्ण जगात सध्या थैमान घातले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या यादीत आता आणखी एका कलाकाराचे नाव जोडले गेले आहे. प्रसिद्ध ब्रिटीश संगीतकार TY याचा करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तो ४७ वर्षांचा होता.
बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार TYला एप्रिल महिन्यात करोनाचा संसर्ग झाला होता. लंडनमधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तो एकदा कोमात देखील गेला होता. परंतु कोमातून बाहेर येताच गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला.
TY एक प्रसिद्ध रॅपर होता. त्याचं खरं नाव बेन चिजिओके असं होतं. परंतु संगीत क्षेत्रामध्ये तो TY या नावानेच ओळखला जायचा. ‘सकर फॉप पेन’, ‘स्पीड मी अप’, ‘थिंक अबाउट अस’, ‘लव्ह यु बेटर’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांची निर्मिती त्याने केली होती. ‘स्पायडरमॅन: इनटू द स्पायडर वर्स’ या सुपरहिरोपटातील ‘सिक्रेड ऑफ द डार्क’ या गाण्यामुळे तो प्रचंड लोकप्रिय झाला होता. गेल्या १५ दिवसांमध्ये बिल कार्पेंटर, अॅलन मेरल, जॉन प्राइन, ऑस्कर चावेझ या चार प्रसिद्ध संगीतकारांचा मृत्यू झाला. या यादीत आता TYचे नाव जोडले गेल्यामुळे हॉलिवूड संगीतसृष्टीत शोककळा पसरली आहे.