‘बाहुबली २’ या चित्रपटाची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. भव्यता, कलाकारांनी साकारलेल्या दमदार भूमिका, माहेष्मतीचं काल्पनिक साम्राज्य, युद्धांची दृष्ये या सर्वांमुळे प्रचंड लोकप्रियता आणि विक्रमी कमाई या दोन गोष्टी चित्रपटाला मिळाल्या. आजही या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये तेवढीच क्रेझ पाहायला मिळते. बाहुबली, भल्लालदेव, देवसेना, कटाप्पा, शिवगामी या व्यक्तिरेखा लोकांच्या मनात कायम राहतील. चित्रपटातील हे कलाकार आता त्यांच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र झाले आहेत. मात्र त्यांचं सेलिब्रेशन अजूनही संपलेलं नाही. या सेलिब्रेशनमध्ये आता बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडनसुद्धा सहभागी झाली आहे.
रविनाने हैदराबादमध्ये नुकतीच ‘बाहुबली’ टीमची भेट घेतली. काही कामानिमित्त रविना हैदराबादला गेली होती आणि तिथे तिची भेट प्रभास, राणा डग्गुबती आणि अनुष्का शेट्टी यांच्याशी झाली. या सर्व कलाकारांनी मिळून रात्रभर पार्टीसुद्धा केली. या टीमसोबतचा एक फोटो रविनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
वाचा : सायना आणि ‘या’ खेळाडूत झालेल्या वादावरील पडदा श्रद्धा उठवणार?
दरम्यान, प्रभासचा आगामी चित्रपट ‘साहो’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अभिनेत्री श्रद्धा कपूर भूमिका साकारणार आहे. तर अनुष्का शेट्टी ‘भाग्मती’ या तेलुगू आणि तामिळ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. राणा डग्गुबतीचा ‘नेने राजू नेने मंत्री’ हा तेलुगू चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता.