हरयाणात भाजपचे उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. भट्टी यांच्या वक्तव्यावर आता अभिनेत्री रवीना टंडननेही टीका केली आहे. ‘ते भित्रे आहेत. सूर्यास्तानंतर आपल्या मुलींना घरी टाळं लावून बंदीस्त करण्यातही हे लोक कमी करणार नाहीत,’ अशी टीका रवीना टंडनने ट्विटरच्या माध्यमातून केली.

हरियाणा भाजपचे अध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलावर छेडछाडीचे आरोप झाल्यानंतर देशभरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. एका आयएएस अधिकाऱ्याच्या मुलीच्या गाडीचा रात्री उशिरा पाठलाग करुन छेडछाड केल्याचा आरोप सुभाष बराला यांचा मुलगा विकास बराला याच्यावर आहे. या प्रकरणात हरियाणा भाजपचे उपाध्यक्ष रामवीर भट्टी यांनी विकास बरालाचा बचाव करताना वादग्रस्त विधान केलं. पीडित मुलगी इतक्या उशिरा रात्री का फिरत होती, असा प्रश्न विचारत भट्टी यांनी नवा वाद निर्माण केला. राजकीय पक्षांपासून ते सोशल मीडियापर्यंत सर्वत्र त्यांच्यावर टीका होऊ लागली. आता टीकाकारांमध्ये रवीना टंडनचंही नाव जोडलं गेलंय. ‘हे भीत्रे लोक अजूनही आपल्या मुलाला पाठीशी घालत आहेत. अशी लोकं सूर्यास्तानंतर आपल्या मुलींना घरात टाळं लावून बसवतील,’ असं ट्विट तिने केलंय. रविनाच्या या ट्विटचं सोशल मीडियावर अनेकांनी समर्थन केलंय. नेटीझन्स तिला सहमती दर्शवत रामवीर भट्टीसारख्या लोकांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.

या प्रकरणी संबंधित तरुणीने तक्रार दाखल केल्यावर विकास बराला याला अटकदेखील करण्यात आली. मात्र यानंतर विकासची जामिनावर सुटका झाली. या संपूर्ण प्रकरणामुळे देशभरातून सुभाष बराला आणि भाजपवर टीका करण्यात येत आहे.