सध्या सलमान खान त्याच्या बहुचर्चित ट्युबलाइट या चित्रपटाची जोरदार प्रसिद्धी करतोय. सलमान खान आता आयुष्यात बराच पुढे गेला आहे. त्याचसोबत त्याच्या प्रेयसींच्या नावाची यादीदेखील मोठी होत गेली. सौमी अली, संगीता बिजलानी, कतरिना, लुलिया यांचे नाव त्याच्या प्रेयसींच्या यादीत घेतले जाते. पण, यात ऐश्वर्या रायचे नाव घेतल्याशिवाय त्याच्या प्रेयसींची यादी कशी पूर्ण होईल. ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले असून ती आता तिच्या सुखी संसारात रमली आहे. पण, आजही सलमानसोबतच्या तिच्या प्रेमप्रकरणाची चर्चा केली जाते. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपला असलेल्या या जोडीचे प्रेमप्रकरण संपुष्टात आल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.

त्यावेळी ऐश्वर्याचे सलमानच्या घरी वारंवार जाणे होत होते. साहजिकच त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी आहे अशी बरीच चर्चा तेव्हा रंगली होती. पण ऐश्वर्याच्या पालकांना त्यांचे नाते रुचत नव्हते. सलमानच्या आधीच्या प्रेमप्रकरणांमुळे त्यांना ऐश्वर्याची त्याच्यासोबतची वाढती मैत्री पसंत नव्हती.

ऐश्वर्याच्या पालकांचा त्यांच्या नात्याला असलेल्या विरोधामुळे या दोघांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. एके दिवशी सलमान मध्यरात्री ऐश्वर्याच्या घराखाली तिच्याशी बोलण्यासाठी गेला होता. मात्र, त्यावेळी तिने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला. पहाटे ३ वाजेपर्यंत तो तिच्या घराची बेल वाजवत राहिल्याचेही म्हटले जाते. इतकेच नाही तर तेव्हा त्याने गच्चीवरून उडी मारण्याची धमकीदेखील दिली होती.

वाचा : जाणून घ्या ‘ज्युनियर जी’मधून प्रसिद्धीस आलेला हा बालकलाकार सध्या करतोय तरी काय?

सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाची हमी हवी होती. मात्र, तेव्हा यशाचे शिखर चढत असलेल्या ऐशला विवाहबंधनात अडकण्याची इच्छा नव्हती. त्यानंतर शांत बसून आपल्या हवे असलेले नाते मिळणार नाही असा समज झालेला सलमान प्रेमात काहीसा हिंसक झाला. कुछ ना कहो चित्रपटाच्या सेटवर सलमानने बराच गोंधळही केला होता. त्यामुळे अभिषेक हा सलमानच्या विरुद्ध झाला. सदर चित्रपटाच्या सेटवर सलमानने हैदोस घालत ऐश्वर्याच्या कारची तोडफोड केली होती.

सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याला तिच्या पालकांचा नकार असला तरी त्यांनी कधीचं या दोघांना एकमेकांना भेटण्यापासून रोखले नाही. पण, दुसरीकडे सलमान त्यांना फार वाईट वागणूक देत होता. त्यामुळे आपल्या पालकांसोबत सलमानच्या अश्या वागण्याने ऐश्वर्या नाखूश होती. त्यावेळी स्टारडस्टने दिलेल्या वृत्तानुसार, सलमानची पूर्वाश्रमीची प्रेयसी सोमी अली हिने आपल्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी त्याची मदत मागितली होती. तेव्हा, सलमान ऐश्वर्याला काहीच कळू न देता सोमीला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला होता. हा प्रकार कळल्यानंतर ऐश्वर्याने सदर गोष्टीच्या खोलात जाण्याचा प्रयत्न केला.

वाचा : आपल्यापेक्षा वयाने मोठ्या अभिनेत्रीला डेट करतोय हा स्टार किड

एका मुलाखती दरम्यान ऐश्वर्या म्हणाली होती की, सलमान मद्यापान करून गैरव्यवहार करायचा तरीही मी त्याच्यासोबत उभी राहिले. माझ्यासोबत व्यभिचारी वागत तो मला शिवीगाळ करायचा. माझा अपमान करायचा. त्यामुळे एका स्वाभिमानी स्त्रीप्रमाणे मी हे नाते संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. माझं हित बघता आणि माझ्या कुटुंबाचा स्वाभिमान राखण्यासाठी मी सलमान खान सोबत काम करणार नाही. माझ्यासाठी सलमान प्रकरण हे एका वाईट स्वप्नासारखे आहे, असे एका प्रसिध्दीपत्रकात ऐश्वर्याने म्हटले होते.