‘वोग इंडिया’ मासिकाने आयोजित केलेल्या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक कलाकार मंडळींनी हजेरी लावली. मात्र या कार्यक्रमाच्या रेड कार्पेटवर सर्वांचं लक्ष वेधलं ते म्हणजे ‘किंग खान’ शाहरुख आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं. त्यामुळे पुन्हा एकदा ऐश्वर्या आणि शाहरुखच्या मैत्रीची माध्यमांमध्ये चर्चा रंगली. पण एक काळ असाही होता, जेव्हा हे दोघं एकमेकांचं तोंडही बघत नव्हते. एक दोन नव्हे तर तब्बल १४ वर्षं हे दोघं एकमेकांशी बोलत नव्हते.

ऐश्वर्या आणि शाहरुखच्या मैत्रीत मीठाचा खडा का पडला याचं कारण खूप कमी जणांना माहित असेल. दोघांमधील वादाची सुरुवात २००३ मध्ये ‘चलते-चलते’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. आता ‘चलते-चलते’ या चित्रपटाचा ऐश्वर्याशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर राणी मुखर्जीच्या आधी ऐश्वर्याची निवड या चित्रपटासाठी झालेली आणि त्याचं थोड शूटिंगही झालं होत. यादरम्यान ऐश्वर्या आणि सलमान खानमध्ये खटके उडत होते. अनेकदा दोघांची भांडणं होत असे. इतकंच नव्हे तर सलमानने ‘चलते-चलते’च्या सेटवर जाऊनही काही वेळा ऐश्वर्याशी भांडण केल्याचं म्हटलं जातं. यामुळे अनेकदा शूटिंग मध्येच बंद करावं लागत होतं. यामुळे शाहरुखला नुकसान सोसाव लागत होतं, कारण तो या चित्रपटाचा निर्मातादेखील होता.

VIDEO : तुम्ही ऑपेरा स्टाइल पसायदान ऐकलंत का?

सलमानचा स्वभाव तापट आहे हे सर्वांनाच माहित आहे. रागाच्या भरात सेटवर येऊन त्याने जोरदार भांडण केलं. या घटनेनंतर अखेर शाहरूखने ऐश्वर्याला चित्रपटातून काढण्याचा निर्णय घेतला. नंतर ऐश्वर्याच्या जागी राणी मुखर्जीला घेण्यात आलं. यामुळे ऐश्वर्या शाहरूखवर नाराज झाली होती. जवळपास १४ वर्षं ती त्याच्याशी बोलत नव्हती. १४ वर्षांनंतर ‘वोग इंडिया’च्या पुरस्कार सोहळ्यात जेव्हा शाहरूख आणि ऐश्वर्याला एकत्र पाहिलं गेलं तेव्हा दोघांच्याही चाहत्यांना आनंद झाला.