‘भरवसा’ या शब्दाचा खरा अर्थ गेल्या काही दिवसांमध्ये सर्वांनाच उमगला असेल. मुंबईची राणी आरजे मलिष्काने सोनू साँगचा आधार घेत त्यावर महानगर पालिकेला निशाणा करत एक विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. ‘मुंबई तुला बीएमसीवर भरवसा नाय का…’ हे गाणं तिने म्हटलं होतं. त्यानंतर शिवसेनेकडून मलिष्काला विरोधही करण्यात आला. पण, माध्यमांनी मात्र हा विषय उचलून धरला आणि एक आरजे ट्रेंडमध्ये आली. ठळक बाम्यांपासून ते अगदी व्हायरल व्हिडिओपर्यंत सगळीकडेच या मलिष्काची चर्चा होत असताना आता आणखी एक व्हिडिओ चर्चेत आला आहे.
दिल्ली असो वा मुंबई, सोनूच्या समस्या एकसारख्याच आहेत. असं कॅप्शन देत ‘सोनू तुझा आरजेवर भरवसा नाय का..’ या गाण्याचा व्हिडिओ ‘रेड एफएम’च्या फेसबुक पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. आरजे रौनकने त्याच्या अनोख्या शैलीत काळा चष्मा लावत हे गाणं म्हटलंय. हवेच्या एका बोटमध्ये बसून ‘रेड एफएम’ची ही मंडळी मलिष्काला पाठिंबा देण्यासाठी उभे ठाकले आहेत. #IsupportMalishka #Potholes #Sonusong #Bajaateraho असे हॅशटॅग देऊन पालिकेला गोड भाषेत समज देत पुन्हा एकदा सोशल मीडियावर ही नवी ‘सोनू’ चर्चेत आली आहे. सत्ताधाऱ्यांवर त्यांच्या ढिल्या व्यवहारामुळे जेव्हा केव्हा टिका केल्या जातात तेव्हा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते. रस्त्यांच्या दुरावस्था, खड्डे या समस्या असतानाही मतं मागण्यासाठी मात्र न चुकता दाराशी येणाऱ्या राजकारण्यांवरही या गाण्यातून निशाणा साधण्यात आला आहे.
वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट
6 songs composed and ready in my head and they are NOT about New YorkI’m a rapper now. Also a breeder apparently and back soon #Mumbai.
— Mumbai Ki Rani (@mymalishka) July 20, 2017
हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून बऱ्याचजणांनी या अनोख्या तंत्राची प्रशंसाही केली आहे. इथे मलिष्काच्या एका गाण्याची चर्चा थांबत नाही तोच दुसरं गाणं चर्चेत आलं आहे. मुख्य म्हणजे अशा प्रकारची एकूण सहा गाणी तयार असल्याचा इशारा खुद्द मलिष्कानेच तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन दिला आहे. तिने केलेलं हे ट्विट पाहता संपूर्ण तयारीनिशी ही मुंबईची राणी सज्ज आहे असं म्हणायला हरकत नाही. दरम्यान, बीएमसीविषयीच्या विडंबनात्मक गाण्यानंतर मलिष्काच्या घरी केलेल्या तपासणीत डेंग्युच्या अळ्या आढळल्या होत्या. यावर अनेकांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. आता त्या नेमक्या कोणत्या प्रतिक्रिया होत्या हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही. आता हे या व्हायरल सोनीला सत्ताधारी पक्ष आळा घालण्यासाठी काय करणार आणि त्यांच्यावर कुरघोडी करण्यासाठी प्रेक्षक, नेटिझन्स आणि माध्यमांचा पाठिंबा घेत ‘मुंबईच्या राणी’ची सेना कोणती खेळी खेळणार याकडेच अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.