महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एकच मार्ग अनेकांना दिसतो. तो म्हणजे महिला आयोग. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी आणि त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी महिला आयोग कार्यरत असतो. पण, याच आयोगाच्या कार्यपद्धतीवर अभिनेत्री कंगना रणौतने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रजत शर्मा यांच्या ‘आप की अदालत या कार्यक्रमात आगपाखड करत कंगनाने महिला आयोगाविरोधात वक्तव्य केल्याचे पाहायला मिळाले. तिने महिला आयोगावर पक्षपाती असल्याचा आरोपही लावला.

इतकंच नव्हे तर महिला आयोगाचे निर्णय विकाऊ असून, श्रीमंतांच्याच कलाने त्यांचे निर्णय दिले जातात, असा आरोप तिने केला. ‘आप की अदालत’ या कार्यक्रमादरम्यान कंगनाने अनेकांचेच जाहीर वाभाडे काढल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे तिने अपूर्व असरानी, आदित्य पांचोली, हृतिक रोशन यांच्यासोबतच महाराष्ट्र राज्य महिला आयोगालाही धारेवर धरले. कंगनाच्या या मुलाखतीनंतर ज्यांच्यावर तिने आरोप लावले आहेत, त्यांनीही प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यामध्ये राज्य महिला आयोगही मागे नाही.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी कंगनाने लावलेले सर्व आरोप फेटाळत कंगनाने कधीही आपली मदत घेतलीच नसल्याचे स्पष्ट केले.

कंगनाने या मुलाखतीत सांगितल्यानुसार, हृतिकने काही खासगी फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर लीक करण्याची धमकी दिली होती. तेव्हा विशाल भारद्वाज यांनी तिला महिला आयोगाची मदत घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी ही एक हायप्रोफाइल केस असल्यामुळे सुरुवातीला बराच उत्साह दाखवला गेला. पण, त्यानंतर मात्र आपल्या हाती निराशाच आल्याचे तिने सांगितले. कंगनाने या मुलाखतीदरम्यान ‘महिला आयोग ढोंगी आहे’, असेही म्हटले.

वाचा : अक्षयसोबत प्रियांकाचं नाव जोडताच ट्विंकलचा राग अनावर

तिच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही बऱ्याच चर्चांना उधाण आले. याविषयी महिला आयोगाच्या वतीने विजया रहाटकर यांनी काही ट्विट करत कंगनाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. कंगनाने कधीही महिला आयोगाची मदत घेतली नसून, ती नाव घेत असलेली व्यक्ती (गुरमीत चड्ढा) आयोगाशी संलग्न नाही, असे त्यांनी ट्विटमध्ये स्पष्ट केले. कंगनाच्या विरोधात करण्यात आलेले हे ट्विट पाहून या वादात तिची बहिण रंगोली हिनेही उडी घेतली. त्यामुळे सध्या तिच्या मुलाखतीचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत, असेच म्हणावे लागेल.