बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या भूमिका असलेल्या ‘चुपके -चुपके’ या चित्रपटाचा लवकरच रिमेक करण्यात येणार आहे. दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्या या चित्रपटामध्ये धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, जया भादुरी, शर्मिला टागोर आणि ओम प्रकाश यांनी प्रमुख भूमिका केल्या होत्या. ११ एप्रिल १९७५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळविली होती. त्यामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट नव्या रुपात प्रेक्षकांसमोर सादर व्हावा यासाठी तब्बल ४४ वर्षांनंतर त्याचा रिमेक करण्यात येणार आहे. सध्या या रिमेकसाठी कलाकारांची निवड करण्यात येत असून राजकुमार राव या चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, ‘चुपके- चुपके’च्या रिमेकची धुरा चित्रपट निर्माता भूषण कुमार आणि लव रंजन हे दोघे मिळून सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये राजकुमार राव ‘ही-मॅन’ अर्थात धर्मेंद्र यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचा रिमेक होत असल्याची संकल्पना राजकुमारला आवडली असून तो धर्मेंद्र यांची भूमिका साकारण्यास उत्सुक असल्याचं त्याने सांगितलं.

११ एप्रिल १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘चुपके- चुपके’मध्ये धर्मेंद्र यांनी ‘प्रोफेसर परिमल’ आणि ‘प्यारे मोहन’ अशा दोन भूमिका निभावल्या होत्या, तर अमिताभ बच्चनने ‘प्रोफेसर सुकुमार सिन्हा’ यांची भूमिका केली होती. तसेच चित्रपटात केश्टो मुखर्जी, असरानी आणि डेव्हिड यांच्याही महत्वपूर्ण भूमिकाही होत्या. हा चित्रपट उत्तम कुमार आणि माधवी मुखर्जी यांच्या १९७१ मध्ये आलेल्या ‘छद्माबेशी’ या चित्रपटाच्या कथानकावर आधारलेला आहे.