‘चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजनाचे साधन नव्हे, तर ती एक भावना आहे’, हे विधान सिद्ध करणारा एक चित्रपट म्हणजे ‘बॉर्डर’. जे.पी. दत्ता दिग्दर्शित या चित्रपटातून भारत-पाकिस्तान युद्धावर भाष्य करण्यात आले होते. १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही अनेकांना एकाच जागी खिळवून ठेवतो. सुनील शेट्टी, अक्षय खन्ना, राखी, पूजा भट्ट, जॅकी श्रॉफ यांच्या लक्षवेधी भूमिका असणाऱ्या या चित्रपटातील संवाद, गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अशा या चित्रपटातील एका गाण्यात झळकलेली ‘ती’ अभिनेत्री तुम्हाला आठवतेय का?

सीमा सुरक्षा दलातील ‘कॅप्टन भैरों सिंह’ची भूमिका साकारणाऱ्या सुनील शेट्टीसोबत त्या अभिनेत्रीचे नाते होते. कारण, तिने चित्रपटात त्याच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ‘बॉर्डर’ चित्रपटात ‘तो चलूँ’ या गाण्यापुरताच ती अभिनेत्री झळकली होती. पण, त्या एका दृश्यात दिसूनही तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ केले. सुनील शेट्टीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेल्या त्या अभिनेत्रीचे नाव आहे शरबानी मुखर्जी. घारे डोळे, निरागस सौंदर्य आणि शाही अंदाज तिच्या चेहऱ्यातून स्पष्टपणे दिसतो. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून सुरु असलेल्या तिच्या सौंदर्याच्या चर्चा आजही सुरुच आहेत.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

शरबानी अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जीची बहिण आहे. तिने मल्याळम चित्रपटांतही काम केले होते. पण, ती खऱ्या अर्थाने ओळखली गेली दत्ता यांच्या ‘बॉर्डर’ चित्रपटामुळे. हा चित्रपट लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला खरा. पण, शरबानी मात्र यानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलीच नाही. सध्याच्या घडीला तिने चित्रपटसृष्टीतून काढता पाय घेतला असून, आता ती सर्वसामान्य आयुष्य जगते आहे. इतर काही कलाकारांप्रमाणे ती सेलिब्रिटी पार्ट्यांनाही फारशी हजेरी लावत नाही. शरबानीच्या वाट्याला यशस्वी भूमिका आल्या नसल्या तरीही ‘बॉर्डर’मधील तिची ओळख प्रेक्षकांच्या मनात आजही घर करुन आहे हेच खरे.