कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसोझाच्या आगामी डान्स चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याचे आपल्या सर्वांना माहितीच आहे. रेमो डिसोझाचा चित्रपट आहे म्हटल्यावर यामध्ये डान्सची एक वेगळीच पातळी प्रेक्षकांसमोर येणार हे नक्की. त्याचप्रमाणे सलमान खानला व्यावसायिक पातळीवरील डान्स करताना पाहायला मिळणार आहे. खरंतर आपल्या चित्रपटात सलमान खानने भूमिका साकारावी अशी रेमोची मनापासून इच्छा होती आणि सलमानने चित्रपटासाठी होकार दिल्यानंतर आपले स्वप्न सत्यात उतरत असल्याचे रेमोने म्हटलं होतं. मात्र नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ५१ व्या वर्षी रेमोच्या चित्रपटाला होकार देऊन मी खूप मोठी चूक केली आहे असं सलमान म्हणाला होता आणि त्याच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षकांना हसू अनावर झाले होते.
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान आपल्या चित्रपटात भूमिका साकारणार आहे म्हटल्यावर तशी जोरदार तयारीही रेमोने मागील दोन महिन्यांपासून सुरू केली आहे. त्याबद्दल सांगताना रेमो म्हणाला, ‘मागील दोन महिन्यांपासून माझे सहकारी सलमानसोबत काम करत आहेत. सलमान सर आता माझ्या चित्रपटाशी बांधिल आहेत त्यामुळे आता ते माघार घेऊ शकत नाहीत. सलमानही डान्समध्ये उच्च पातळी गाठू शकतो, एक डान्स गुरू बनू शकतो हे मला यातून सिद्ध करायचे आहे.’
वाचा : मी कोणासाठीच स्वतःला बदलणार नाही- प्रियांका
‘सलमानला कितीही कठीण डान्स स्टेप्स दिले तरी आपल्या वेगळ्या स्टाईलने करण्याचा तो प्रयत्न करतो. मात्र अशावेळी अनेकदा कोरिओग्राफरला मर्यादा येतात. माझ्या आगामी चित्रपटात वरच्या पातळीवरील डान्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्यानुसार सलमान सराव करतोय आणि जास्तीत जास्त वेळ डान्ससाठी देण्याचा प्रयत्न करतोय,’ अशी माहिती रेमोने एका मुलाखतीदरम्यान दिली. चित्रपटाच्या तयारीबाबत रेमोला विचारले असता तो म्हणाला, ‘सलमान आता आपले वजन घटवण्याच्या तयारीत आहे. नवीन डान्स स्टेप्स तो शिकतोय आणि या चित्रपटात सलमान ज्याप्रकारे तुम्हाला डान्स करताना दिसेल ते तुम्ही याआधी कधीच पाहिले नसणार हे नक्की.’
VIDEO : चला ‘थुरासिक पार्क’च्या सफरीवर…
रेमो डिसूझाने याआधी सलमानच्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. मात्र त्याच्या या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना सलमानचे नवे रूप पाहायला मिळणे औत्सुक्याचे ठरणार आहे.