बॉलिवूडच्या दोन दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. अजय देवगणचा कॉमेडी चित्रपट ‘गोलमाल अगेन’ आणि आमिर खानचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ या आठवड्यात प्रदर्शित होणार आहेत. आमिरचा चित्रपट अजय देवगणच्या चित्रपटाच्या एक दिवस आधी प्रदर्शित होतोय. त्यामुळे साहजिकच दोघांमध्ये स्पर्धा होणे अपेक्षित आहे. मात्र, या स्पर्धेचा विचार न करता या दोन्ही कलाकारांनी आनंदाने एकमेकांची भेट घेतली आहे.

१९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इश्क’ या चित्रपटात अजय आणि आमिरने एकत्र भूमिका साकारली होती. तेव्हापासूनच या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी हे दोघं एकत्र आले. अजयसोबतचा फोटो आमिरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. अजयनेही या फोटोला लाइक करत कमेंट केलं आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘गोलमाल अगेन’ हा चित्रपट २० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये अजयसोबतच परिणीती चोप्रा, अर्षद वारसी, तुषार कपूर, तब्बू, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे यांच्याही भूमिका आहेत. तर आमिरचा ‘सिक्रेट सुपरस्टार’ १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत आहे. यामध्ये ‘दंगल गर्ल’ झायरा वसीम मुख्य भूमिकेत झळकणार आहे. कोणता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार, हे येत्या काळात समजेल.