अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या वर्चस्वामुळे पुन्हा एकदा संकट निर्माण झालं आहे. देशातील नागरिक सामान न घेताच देश सोडून पळत असल्याचं चित्र आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर महिलांमध्ये मोठी दशहत निर्माण झालीय. तिथल्या महिला सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची मागणी करत आहेत. सोशल मीडियावर समोर येत असलेले तेथील फोटोज आणि व्हिडीओ आणखी भयावह आहेत. अफगाणिस्तानमधल्या महिलांबाबत देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. यात बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा यावर व्यक्त होताना दिसून येत आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्तीने सुद्धा अफगाणिस्तानमधल्या महिलांबाबत आपली चिंता व्यक्त केलीय. अफगाणिस्तानमध्ये महिलांना विकलं जातंय, हे संपूर्ण जगासाठी लज्जास्पद आहे, असं रिया चक्रवर्तीने म्हटलंय.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अफगाणिस्तानमधली भयावह परिस्थिती पाहून तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक मेसेज शेअर करत तिथल्या महिलांच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. “एकीकडे जगभरातील महिला त्यांच्या समान वेतनासाठी लढत आहेत, तर दुसरीकडे त्यांना अफगाणिस्तानमध्ये विकलं जातंय. तिथे महिला स्वतःच गुलाम बनल्या आहेत. अफगाणिस्तानातील महिला आणि अल्पसंख्यांकांची स्थिती पाहून माझं मन फार दुखावलंय. मी जागतिक नेत्यांना आवाहन करते की त्याविरुद्ध उभे राहा. पितृसत्ता नष्ट झाली पाहिजे. स्त्रिया सुद्धा मानव आहेत.”, असं रिया चक्रवर्तीने म्हटलंय.

या मेसेजमध्ये तिने महिलांसाठी मदतीचे आवाहन करत “पितृसत्ता मोडा … महिला सुद्धा मानव आहेत” असं देखील म्हटलंय.

 

rhea-chakraborty-afghanistan
(Photo: Instagram/ rhea_chakraborty)

 

अभिनेत्री रिया चक्रवर्तीने पितृसत्ता विरोधात यापूर्वी अनेकदा आवाज उठवताना दिसून आली होती. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात जेव्हा रिया चक्रवर्ती नार्कोटिक्स ब्युरोच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी पोहचली होती तेव्हा तिने काळ्या रंगाचा टीशर्ट घातला होता, त्यावर तिने त्यावेळी सुद्धा पितृसत्ता विरोधात एक वाक्य लिहिलेलं होतं. “गुलाब असतात लाल, व्हायोलेट असतात निळे, पितृसत्ता फोडून काढू, तु आणि मी सगळे.” असं तिच्या टी शर्टवर लिहिलेलं होतं. याचे बरेच फोटोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. रिया चक्रवर्ती पितृसत्ताक विचारांची बळी ठरली आहे, असं मत अनेकांनी व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता अफगाणिस्तानमधल्या महिलांच्या भयावह परिस्थितीबाबत बोलताना ती पुन्हा एकदा पितृसत्ता विरोधात आपला आवाज उठवताना दिसून आली आहे.

 

अभिनेता करण टॅकरने देखील या प्रकरणावर पोस्ट शेअर केली आहे. “मानवतेला लाज वाटते … जग फक्त शांतपणे तमाशा बघत बसले आहे”, असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे. याशिवाय चित्रपट निर्माते शेखर कपूर यांनीही चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलं की, “अफगाणिस्तानच्या लोकांसाठी विशेष प्रार्थना. परकीय शक्तींच्या औपनिवेशिक महत्त्वाकांक्षांसाठी एक राष्ट्र तुटले आणि उद्ध्वस्त झाले.”

karan-tacker-afganistan
(Photo : Instagram/ karantacker)

 

अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच अफगाणिस्तानमधील परिस्थिती झपाट्याने बिघडत असताना आणि तालिबान तेथे आपली पकड मजबूत करत असतांना भारतीय कर्मचाऱ्यांना बाहेर का काढण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.