अमली पदार्थांच्या खरेदी प्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने एनसीबीकडे (अमली पदार्थविरोधी पथक) बॉलिवूड इंडस्ट्रीतील तीन नावांचा खुलासा केला आहे. अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंह आणि फॅशन डिझायनर सिमोन खंबाटा या नावांचा खुलासा केल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. एनसीबीच्या चौकशीदरम्यान रियाने २५ बड्या कलाकारांची नावं सांगितली असल्याचं म्हटलं जातंय. त्यापैकी सर्वांत आधी ही तीन नावं समोर आली आहेत. सध्या सोशल मीडियावर सारा अली खान व रकुल प्रीत सिंहचीच चर्चा आहे.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, रियाने चौकशीदरम्यान बॉलिवूडमध्ये होणाऱ्या ड्रग्स पार्ट्यांविषयी काही खुलासे केले आहेत. रियाने घेतलेल्या या तीन व्यक्तींविरोधात एनसीबी पुरावे गोळा करणार आहे. दरम्यान शुक्रवार रात्रीपासून सारा अली खान ट्विटरवर ट्रेण्ड होत असून तिच्यावर अनेक मीम्ससुद्धा व्हायरल झाले आहेत.

आणखी वाचा- सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण: रियाने उघड केलेल्या कलाकारांच्या यादीत सारा अली खान, रकुलप्रीतचा समावेश?

रियाला १४ दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून तिचा जामीन अर्जसुद्धा मुंबईतल्या विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला.