अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. तर आर्थिक बाबींचा तपास ईडीकडून करण्यात येत आहे. ईडीकडून अभिनेत्री रिया चक्रवर्तीची दोनदा चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान रियाने सुशांतबाबत नवा खुलासा केला आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये सुशांत व रिया युरोपला फिरायला गेले होते. या ट्रिपदरम्यान काय घडलं, त्याचा खुलासा रियाने ईडीकडे केला आहे.

‘न्यूज १८’ने दिलेल्या वृत्तानुसार, रियाने ईडीला सांगितलं की ऑक्टोबर २०१९ मध्ये रिया आणि सुशांत इटलीतील फ्लॉरेंन्स या ठिकाणी फिरायला गेले होते. “फ्लॉरेन्समध्ये आम्ही एका ६०० वर्षे जुन्या हॉटेलमध्ये थांबलो होतो. त्या हॉटेलमधील रुम्स फार प्रशस्त होत्या आणि भितींवर विविध पेंटिंग्स लावले होते. त्यातील एका पेंटिंगला पाहून सुशांत फार घाबरला होता. तो अचानक रुद्राक्षची माळा घेऊन जप करू लागला होता. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती खराब होऊ लागली होती”, असं रियाने सांगितलं. रियाचा भाऊ शौविकसुद्धा त्यांच्यासोबत होता. “त्या पेंटिंगला पाहून सुशांत खूप घाबरला होता. दुसऱ्या दिवशी सुशांत आणि शौविक ऑस्ट्रियाच्या डिटॉक्स सेंटरमध्ये गेले. तिथेसुद्धा सुशांतला बरं वाटत नव्हतं. आमची ट्रिप २ नोव्हेंबर २०१९ रोजी संपणार होती. पण २८ ऑक्टोबर रोजीच आम्ही मुंबईला परतलो. युरोप ट्रिपवरून परतल्यानंतर सुशांत त्याच्या रुममध्ये एकटाच राहू लागला होता.”, असं रिया पुढे म्हणाली.

सुशांतचा कूक नीरज याने बिहार पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात युरोप ट्रिपचा उल्लेख केला होता. ‘सुशांत ट्रिपला जाण्यापूर्वी ठीक होता. पण ट्रिपवरून परत आल्यापासून त्याची तब्येत बिघडली होती’, असं त्याने सांगितलं होतं.