बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पाटणा सेंट्रल झोनचे महानिरीक्षक संजय सिंग यांनी दिली. दरम्यान या प्रकरणाची चौकशी मुबई पोलिसांनीच करावी यासाठी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

अवश्य पाहा – मृत्यूनंतर सुशांत ट्विटरवर आलिया भट्टला फॉलो करतोय? कंगनाने विचारला प्रश्न

सुशांतच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांकडेच राहावी यासाठी रिया चक्रवर्ती प्रयत्न करत आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार रियाचे वकिल सतीश मानेशिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये सुशांत प्रकरणाची चौकशी मुंबईतच केली जावी, अशी विनंती त्यांनी कोर्टाकडे केली आहे.

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप केले आहेत. यामध्ये पैसे उकळल्याचा, मानसिक त्रास दिल्याचाही आरोप आहे. सुशांतच्या नातेवाईकांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर नाराजी व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे सुशांत सिंहच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी व्हावी अशी वारंवार मागणी केली जात आहे. ही मागणी करणाऱ्यांमध्ये भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी, भाजपा खासदार निशिकांत दुबे, पप्पू यादव, तेजस्वी यादव, अभिनेता शेखर सूमन तसंच रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. रिया चक्रवर्तीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे सीबीआय चौकशीची मागणी केली होती. भाजपा नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्रही लिहिलं आहे.