आपल्या हुकमी अभियनाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ६६ वर्षांचे होते. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला होता. ‘ओम पुरी यांना आज सकाळी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. आम्ही सर्वचजण आता त्यांच्या घरी जात आहोत’, अशी माहिती ओम पुरी यांचे निकटवर्तीय अशोक पंडित इंडियन एक्सप्रेसशी बोलताना दिली.

पंडित यांनी ट्विटरद्वारेही ट्विट करत ही दु:खद वार्ता सर्वांना दिली. ‘एक दु:खद आणि धक्कादायक घटना घडली आहे. ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे’, असे ट्विट त्यांनी केले. ओम पुरी यांच्या निधनामुळे सध्या चित्रपटसृष्टी आणि संपूर्ण कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. सध्या विविध क्षेत्रातील मंडळी सोशल मीडियाद्वारे ओम पुरी यांना श्रद्धांजली देत आहेत.

अनुपम खेर, मधुर भंडारकर, रितेश देशमुख यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे ओम पुरी यांना श्रद्धांजली दिली आहे. ओम पुरी यांच्यासोबत अभिनय क्षेत्रामध्ये बराच काळ काम केलेल्या अनुपम खेर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन ‘ओम पुरी यांच्या निपचित पडलेल्या देहाकडे पाहताना ते आपल्यातून गेले आहेत यावर विश्वासच बसत नाहीये’, असे ट्विट त्यांनी केले.

भारतीय, पाकिस्तानी, ब्रिटिश आणि काही हॉलिवूडचित्रपटांमधूनही ओम पुरी यांच्या दर्जेदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आजवर अभिनय क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.