करोना विषाणूने अवघ्या मानवजातीला घेरलं आहे. संपूर्ण जगावर या विषाणूचं सावट असून प्रत्येकजण या भीषण आपत्तीला सामोरं जात आहे. चीनमधून फैलावलेल्या या विषाणूने भारतात हातपाय पसरले आहेत. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ मार्च रोजी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर अभिनेता ऋषी कपूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सल्ला दिला आहे. त्यामुळे सध्या ऋषी कपूर यांच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे.

सध्या संपूर्ण जगावर करोना विषाणूचं सावट आहे. त्यामुळे प्रत्येक देश संकटाशी लढा देत आहे. यामध्येच ऋषी कपूर यांनी मात्र पाकिस्तानप्रती चिंता व्यक्त केली आहे. तसंच पाकिस्तानातील नागरिकही आम्हाला प्रिय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्यांच्या देशवासीयांसाठी, नागरिकांच्या आरोग्यासाठी काही ठोस उपाययोजना कराव्यात यासाठी सल्ल्याची गरज आहे. पाकिस्तानातील नागरिकही आम्हाला प्रिय आहेत. एकेकाळी आपण सगळे एक होतो. त्यामुळे आम्हाला त्यांचीही चिंता आहे. सध्या जागतिक संकट सुरु आहे. त्यामुळे येथे अहंकार आडवा येता कामा नये. आम्ही पाकिस्तानी नागरिकांवरही प्रेम करतो. माणुसकीचा विजय असो”, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं आहे.

वाचा : NirbhayaCase : ‘वेळ लागला, पण न्याय मिळाला’; सेलिब्रिटींनाही भावना अनावर

दरम्यान, ऋषी कपूर यांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर त्यांचीच चर्चा सुरु आहे. ऋषी कपूर कायम समाजात घडणाऱ्या घटनांवर व्यक्त होत असतात. बऱ्याच वेळा स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्यावर ट्रोल होण्याचीही वेळ येते. मात्र या ट्रोलर्सला ते बेधडकपणे उत्तर देताना दिसून येतात.

 

Story img Loader