ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचा बऱ्याचदा राग अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. मग ते एखाद्या कार्यक्रमात बोलत असो किंवा सोशल मीडियावरील पोस्ट असो. त्यांची वादग्रस्त विधाने नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. राज कपूर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ऋषी कपूर यांनी काही पत्रकारांच्या उपस्थितीवरच आक्षेप घेतला.

ज्या ठिकाणी प्रकाशन सोहळा पार पडला तेथील स्वच्छतागृहातून बाहेर पडणाऱ्या काही पत्रकारांना ऋषी कपूर यांनी हटकले. ‘तुम्ही कोण आहात,’ असा त्यांनी प्रश्न विचारला. इतकेच नाही तर ‘फुकटची दारू प्यायला येतात..’ असे बडबडत ते तेथून निघाले. थोड्या वेळानंतर त्यांचे सुरक्षारक्षक तेथे आले आणि ‘तुम्ही इथे थांबू नका,’ असे म्हणत पत्रकारांना बाहेर जाण्याचा इशारा केला. तेवढ्यात प्रकाशन संस्थेचे अधिकारी तेथे आले आणि त्यांनी पत्रकारांना थांबवले.

वाचा : शहिद सैनिकाच्या मुलीचे अनुभव ऐकून शाहरूखचे डोळे पाणावले

या कार्यक्रमात संबंधित पत्रकारांना निमंत्रण असतानाही ऋषी कपूर यांचे वागणे अनेकांनाच खटकले. अखेर या अपमानास्पद वागणुकीचा निषेध करत पत्रकारांनीही कार्यक्रमातून काढता पाय घेतला.