काही काळ कर्करोगाने ग्रस्त असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे मुंबईत गुरूवारी निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. बुधवारी त्यांना मुंबईतील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेतल्यानंतर ऋषी कपूर सप्टेंबरमध्ये भारतात परतले होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये ऋषी कपूर यांना दोनदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अभिनेता इरफान खानच्या निधनाला २४ तासदेखील पूर्ण होत नाहीत, तर कलाविश्वावर हा दुसरा आघात झाला. त्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे. क्रिकेट विश्वातूनही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

काल इरफान खान, आज ऋषी कपूर.. सत्य पचवणं खूप अवघड जातंय – विराट कोहली

प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी ट्विट करून ऋषी कपूर यांना आदरांजली वाहिली. ऋषी जी आमचे लहानपणापासूनचे आदर्श होते, असे हर्षा भोगले यांनी नमूद केले. याशिवाय, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे, माजी फलंदाज मोहम्मद कैफ आदी क्रिकेटपटूंसह क्रीडा विश्वातूनही ऋषी कपूर यांना ट्विटच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने एक भावनिक पोस्ट करत ऋषी कपूर यांच्याबद्दलच्या आपल्या भावनांना वाट करून दिली.

ऋषी कपूर यांच्या निधनाची बातमी समजली. हे वृत्त समजल्यावर मला खूपच दु:ख झाले. ऋषी कपूर यांचे सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालो. मी त्यांना अनेकदा भेटलो होतो. प्रत्येक वेळी ते हसून माझं स्वागत करायचे आणि कायम खुश दिसायचे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, हीच प्रार्थना. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे, अशा शब्दात सचिनने त्यांना आदरांजली वाहिली.

ही बातमी वाचा – “तू तर करोना व्हायरसपेक्षाही घातक…”; ख्रिस गेलचा संताप

ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी दक्षिण मुंबईत झाला. ‘चिंटू’ या टोपण नावानेही ते ओळखले जात. बॉलिवूडचे शोमॅन दिग्दर्शक आणि अभिनेते राज कपूर यांचे ते दुसरे पुत्र. ज्येष्ठ बंधू रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्यासोबत त्यांनी मुंबईतील कॅम्पेन स्कूल कॉन्व्हेंट स्कूलमधून शिक्षण घेतलं. ऋषी कपूर यांनी जवळपास ९२ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. सगळ्याच पिढ्यांमध्ये त्यांचा चाहतावर्ग होता. काही दिवसांपूर्वीच कर्करोगाशी यशस्वी झुंज देऊन ऋषी कपूर भारतात परतले होते. ११ महिने ११ दिवस न्यूयॉर्कमध्ये उपचार घेऊन ते भारतात परतले होते.