दिल्ली आणि एनसीआरमधील वायू प्रदुषणाची समस्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. शुद्ध हवेचा विचार केला तर उत्तरेतील अनेक राज्यांमध्ये तीन वर्षांचा नीचांक गाठला गेला आहे. हवेचा दर्जा कमालीचा घसरल्यामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. दिल्लीमध्ये तर शाळांना काही दिवस सुट्टी द्यावी लागली होती.या संपूर्ण परिस्थितीवर अभिनेते ऋषी कपूर यांनी मार्मिक ट्विट केलं आहे.

‘वाह रे दिल्ली! पोलीस मागतायत संरक्षण, वकील मागतायत न्या तर लोक मागतायत ऑक्सिजन! देख तेरे इंसान की हालत क्या हो गई भगवान कितना बदल गया इंसान’, असं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं आहे. दिल्लीच्या वाढत्या प्रदुषणामुळे फक्त नागरिकच नाही तर सरकार आणि सेलिब्रेटीसुद्धा चिंतेत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही ट्विट करत प्रदुषणाविषयी चिंता व्यक्त केली होती.

दिल्ली प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांत टिप्पणी केली. ‘दिल्लीत जी परिस्थिती आहे, तशी कोणत्याही सुसंस्कृत देशांमध्ये नसते, जगण्याचा अधिकार सर्वात महत्वाचा आहे’, असं कोर्टाने म्हटलं.