गायन, नृत्य यांसारख्या कलागुणांना वाव देणारे रिअॅलिटी शोज शहरांपासून खेड्यापाड्यातील लोकांना त्यांचे स्वप्न साकार करण्याची संधी देतात. अशाच एका रिअॅलिटी शोमुळे १२ वर्षांच्या आफताबला त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याची संधी मिळाली. आफताबने शनिवारी ‘राइसिंग स्टार ३’ या गायनाच्या रिअॅलिटी शोचे विजेतेपद पटकावले. त्याला ‘राइझिंग स्टार’ची ट्रॉफी आणि १० लाख रुपये बक्षिस मिळाले. बक्षिसाची ही रक्कम बहिणीच्या लग्नासाठी वापरणार असल्याचं त्याने सांगितलं.

‘माझे बाबा माझ्यासाठी प्रेरणा आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. मी कोणत्या श्रीमंत घरातून आलो नाही. बाबांना मी खूप मेहनत करताना पाहिलं आहे. मला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. हा त्यांचा विजय आहे, माझा नाही,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या. दुसरीकडे बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खानने त्याची खूप मोठी मदत केली आहे.

‘राइझिंग स्टार ३’मध्ये पाहुणा कलाकार म्हणून सलमानने हजेरी लावली होती. त्यावेळी आफताबच्या वडिलांनी त्यांच्या घराच्या डागडुजीसाठी तीन लाख रुपयांचं कर्ज घेतल्याचं सलमानला समजलं. हे समजताच सलमानने आफताबच्या वडिलांचं कर्ज फेडलं. ‘मी आणखी मेहनत करत भविष्यात एकदा तरी सलमानसोबत काम करण्याची संधी नक्की मिळवेन,’ असं म्हणत आफताबने त्याचे आभार मानले.

कलर्स टीव्हीवरील या रिअॅलिटी शोचे परीक्षक शंकर महादेवन, नीती मोहन आणि दिलजीत दोसांज होते. तर आदित्य नारायण या शोचा सूत्रसंचालक होता. आफताबने वडिलांकडूनच संगीताचं शिक्षण घेतलं. याआधीही त्याने रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला होता.