मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने नुकताच १७ तारखेला ४० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसाला बॉलिवूड सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या. पण अनेकांचे लक्ष मात्र एकाच शुभेच्छाकडे लागून राहिले होते ते म्हणजे जेनेलियाच्या शुभेच्छाकडे. जेनेलियाने रितेशसोबतचा एक फोटो शेअर करत छानसा मेसेज लिहून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
जेनेलियाने फक्त सोशल मीडियावर शुभेच्छाच दिल्या नाहीत तर रितेशला छानसं गिफ्टही दिलं. जेनेलियाने नुकतीच भारतात लॉन्च झालेली टेस्ला एक्स ही महागडी कार वाढदिवसाला गिफ्ट दिली आहे. या गाडीची भारतातील किंमत सुमारे ६८ ते ७० लाखांच्या घरात आहे. टेस्ला एक्स गाडी विजेवर चालणारी असून या गाडीला एकूण पाच दरवाजे आणि अत्याधुनिक सुविधा असलेली ही गाडी १३५ किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने सुसाट धावते. विजेवर चालणारी गाडी असल्यामुळे आरटीओच्या करांमधून सूट मिळाल्याचे कळते.
रितेशने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या गाडीचा फोटो शेअर करत म्हटले की, ४० वर्षाच्या मुलाला विशीतला असल्याप्रमाणे कसे वागवायचे हे बायकोला नक्कीच माहीत आहे.
बॉलिवूडमधील आदर्श जोडपं म्हणून या दोघांकडे पाहिले जाते. नऊ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जेनेलियाने २०१२ मध्ये लग्न केले. या दोघांना रिआन आणि राहिल ही दोन मुलं आहेत.