नेहमी रेडिओवर बडबड करणाऱ्या आरजे मलिष्काने व्हायरल झालेल्या ‘सोनू तुझा मायावर भरवसा नाय काय..’ या गाण्याच्या ट्रेंडमध्ये आणखा एका गाण्याने भर पाडली. ‘मुंबई तुझा बीएमसीवर भरवसा नाय काय’ हे गाणं मलिष्का आणि तिच्या शोमधील बॉईजेसने गायलं. या गाण्यातून मुंबई, खड्डे, दर पावसाळ्यात मुंबापुरीची होणारी तुंबापूरी या सर्व गोष्टींकडे लक्ष वेधलं होतं. एका अर्थी या विडंबनात्मक गाण्यातून तिने बीएमसीच्या काराभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.

सध्या सर्वत्र मलिष्काच्याच नावाची चर्चा सुरु असताना आणि तिच्या ‘भरवसा नाय काय’च्या व्हिडिओला संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच आता मलिष्काने एक नवा व्हिडिओ तिच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये मलिष्काने तिला पाठिंबा देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे आणि इतर सर्वांचेच आभार मानले आहेत. मुंबईच्या राणीने मानलेले हे आभार आता या प्रकरणाला आणखी कोणतं वळण देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सोशल मीडियावर मलिष्काचं हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. तिच्या नावाभोवती असणारं वलय आणि गेल्या काही दिवसांपासून व्हायरल झालेली सोनू या सर्व कारणांमुळे मलिष्काने सादर केलेल्या सोनूच्या या नव्या व्हर्जनला अनेकांनीच प्रतिसाद दिला. पण, सत्ताधाऱ्यांना मात्र तिची ही कल्पक बुद्धी रुचली नाही. मलिष्कावर ५०० कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकण्यात आला होता. त्यामागोमागच मलिष्काच्या घराबाहेर डेंग्युच्या अळ्या सापडल्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालं आहे.

https://www.instagram.com/p/BWvH6YCA26V/

दरम्यान, ‘बीएमसीवर भरवसा नाय का?’ असं म्हणून मुंबई महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणणाऱ्या आरजे मलिष्का आणि महापालिका-शिवसेनेच्या वादात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उडी घेतली होती. ‘मलिष्का तू एकटी नाही…आम्ही आहोत तुझ्याबरोबर…वाघोबा करतो म्याव म्याव…आम्ही आणि मलिष्का बहीण भाव!!’ असं म्हणत शिवसेनेला घायाळ करण्याचा प्रयत्न केला.