संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ सिनेमाचा वाद आता जास्तच चिघळत चालला आहे. सिनेमाला विरोध करणाऱ्या करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने दीपिका पदुकोणचे शुर्पणखेप्रमाणे नाक कापण्याची धमकी दिली. १ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमात दीपिकाची मुख्य भूमिका आहे. करणी सेनेने दीपिकाचे नाक कापण्याची फक्त धमकीच दिली नाही तर १ डिसेंबरला भारत बंदची घोषणाही केली.
उत्तर प्रदेश सरकारनेही सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून सेन्सॉर बोर्डाला हा सिनेमा लक्षपूर्वक पाहण्याची विनंती केली.

इतिहासाशी निगडीत हा सिनेमा असल्यामुळे अनेकांच्या भावनांचा विचार करावा लागेल. तसेच गुरूवारी राजस्थानचे प्रदेशाध्यक्ष महिपाल सिंह यांनी एका व्हिडिओमार्फत, राजपूतांनी महिलांवर कधीही हात उगारला नाही पण गरज पडली तर लक्ष्मणाने शुर्पणखेचे जसे नाक कापले होते तसेच करणी सेना दीपिकासोबत करेल, अशी दीपिकाला धमकी दिली. तर करणी सेनेचे प्रमुख लोकेंद्र सिंह कलवी यांनी पत्रकार परिषद घेऊन १ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले. या सगळ्यात आता मेरठचे राजपूत नेता अभिषेक सोनने भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्यांना पाच कोटी रुपये बक्षिस देण्याचे कबूल केले. अभिषेकच्या या विधानामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख जशी जवळ येते तशी संकटं अजून वाढताना दिसत आहेत.

कलवी म्हणाले की, आम्ही लाखोंनी एकत्र येऊ. आमच्या पूर्वजांनी त्यांच्या रक्ताने इतिहास लिहिला आहे. त्यांच्या या बलिदानाला आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही. आम्ही १ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन करु. केंद्रीय मंत्री उमा भारती यांनीही गुरूवारी भन्साळी विरोधात ट्विट केले. ‘जर पद्मावतीचा आदर करतो असे म्हणतो तर ही आपली नैतिक जबाबदारी आहे की आपण इतर महिलांचाही आदर केला पाहिजे.’
दरम्यान, सिनेमाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान संजय लीला भन्साळी यांना करणी सेनेने धक्काबुक्की केली होती. या पार्श्वभूमीवर भन्साळी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी सिनेनिर्मात्यांच्या असोसिएशनने महाराष्ट्र सरकारकडे केली होती. बुधवारी भन्साळी यांचे निवासस्थान, कार्यालयाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली.