‘ती’ च्या प्रतिशोधाचा थरार
नात्यांच्या सुरक्षित चौकटीत, हसत खेळत आनंदी जीवन जगणाऱ्या आणि स्वत:चं कुटुंब हेच विश्व मानणाऱ्या सर्वसाधारण स्त्रिच्या आयुष्यात जेव्हा एखादं अनपेक्षित वादळ येतं तेव्हा तिचं संपूर्ण आयुष्यच उध्वस्त होतं. आणि मग हीच सर्वसाधारण स्त्री तिच्या भोवतालची सुरक्षित चौकट मोडून अन्याय मोडून काढते. एक अनपेक्षित अनुभव देणाऱ्या ‘ती’ च्या प्रतिशोधाचा थरार म्हणजेच ‘झी युवा’वर नवीन येणारी मालिका ‘रुद्रम’.
या मालिकेद्वारे छोटय़ा पडद्यावर एक अप्रतिम थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे . प्रत्येक भागाबरोबर एक वेगळीच उत्कंठा वाढवत ‘रुद्रम’ या मालिकेचा प्रवास सुरु होतो . सगळ्यात वेगाने घडणारी आणि तरीही केवळ ठराविक भागांमध्ये संपणारी ही गोष्ट अतिशय लक्षणीय आणि उल्लेखनीय आहे. छोटय़ा पडद्यावर बऱ्याच दिवसांनी मुक्ता बर्वे एका वेगळ्या आणि सकस भूमिकेत दिसणार आहे. ‘झी युवा’ वर ७ ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता ‘रुद्रम’ ही थरारक मालिका पहायला मिळणार आहे.
यात मुक्ताबरोबर वंदना गुप्ते , सतीश राजवाडे , मोहन आगाशे , संदीप पाठक , किरण करमरकर , मिताली जगताप , सुहास पळशीकर विवेक लागू , सुहास सिरसाट , सई रानडे , अनिरुद्ध जोशी , मिलिंद फाटक , सुनील अभ्यंकर , आनंद अलकुंटे , किरण खोजे , आशिष कुलकर्णी अशा उत्तमत्तोम नामांकित कलाकारांची मांदियाळी असणार आहे. त्यामुळेच रसिकांसाठी ही मालिका एक मेजवानी ठरणार आहे.
‘सध्या अगदी नवीन आणि दर्जेदार आशय प्रेक्षकांना देणारी वाहिनी म्हणून ‘झी युवा’ची एक वेगळी ओळख प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. या मालिकेची संकल्पना ‘झी युवा’ या वाहिनीची असून या मालिकेची निर्मिती निखिल सेठ , विनोद लव्हेकर , संदेश कुलकर्णी यांच्या ‘पोतडी एंटरटेनमेंट’ने केला आहे.
गिरीश जोशी सारख्या लेखकाच्या लेखणीतून आकाराला आलेल्या आणि भीमराव मुडे सारख्या उत्कृष्ट दिग्दर्शकाच्या दिग्दर्शनाखाली त्तयारी होणारी ही मालिका गर्दीत उठून दिसणारी वेगळी मालिका आहे.
उत्कंठा खिळवून ठेवेल – बवेश जानवलकर
प्रेक्षकांची आवड निवड लक्षात घेऊनच उत्तमोत्तम कलाकारांना घेऊन ‘रुद्रम’ च्या निमित्ताने वेगवान आणि थरारक गोष्टीची मांडणी करणारी एक संपूर्ण मिनी सिरीज प्रेक्षकांसमोर जिवंत होणार आहे. मोठे कलाकार आणि तितक्याच ताकदीच्या लेखकाची आणि दिग्दर्शकाची एक नवी मालिका म्हणूनही ‘रुद्रम’कडे पाहिले जाऊ शकते.ही मालिका पहिल्या भागापासून ते शेवटच्या भागापर्यंत प्रेक्षकांची उत्कंठा खिळवून ठेवेल,’ असा विश्वास ‘झी युवा’चे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलकर यांनी व्यक्त केला.