चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीला कलाकारांसोबतच बी- टाऊनमध्ये येणाऱ्या नव्या पिढीने आतापासूनच प्रकाशझोतात येण्यास सुरुवात केली आहे. अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ इशान खत्तर आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर सध्या एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. एका चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या वेळी शाहिद आणि इशान यांना एकत्र पाहण्यात आलं होतं. चित्रपटसृष्टीत पदार्पणापूर्वीच अशा प्रकारे चर्चेत आलेल्या इशानला त्याच्या मोठ्या भावाने म्हणजेच शाहिदने चांगलाच दम भरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शाहिदने इशानला रागे भरलं असून त्याने फक्त बॉलिवूड पदार्पणावरच लक्ष केंद्रित करावं अशी ताकिद दिली आहे. एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, इशानने फक्त त्याच्या करिअरवरच लक्ष द्यावं. त्याच्या करिअरच्या आड या खासगी गोष्टी येऊ देऊ नयेत असं शाहिदचं मत आहे.

‘बियाँड द क्लाउड्स’ या चित्रपटामध्ये सध्या इशान व्यस्त आहे. त्यासोबतच मराठीतील विक्रमी चित्रपट ‘सैराट’च्या हिंदी रिमेकमध्येही इशानची वर्णी लागली असल्याचं वृत्त आहे. या चित्रपटात तो आणि जान्हवी कपूर स्क्रीन शेअर करणार असल्याचंही म्हटलं जात आहे. इशानसमोर असलेल्या सुवर्णसंधी आणि चित्रपटसृष्टीत आता कुठे सुरु होणारी त्याची कारकीर्द पाहता शाहिदला त्याची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे. याविषयीच एका मुलाखतीत शाहिदने इशाविषयीचं त्याचं मत मांडलं होतं.

वाचा: Karan Johar Birthday Party : रणबीरचे लक्ष वेधण्याचा जान्हवी कपूरने केला प्रयत्न

‘या इंडस्ट्रीत काम करुन मला जवळपास १३ वर्षे झाली आहेत. जेव्हा माझ्या कारकिर्दीला सुरुवात झाली होती त्यावेळी इशान फक्त नऊ वर्षांचा होता. त्याचं बरंच बालपण माझ्यासोबत, चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यानच गेलं आहे. खरंतर चित्रपटसृष्टीला इतक्या जवळून पाहण्याची संधी त्याला मिळणं ही नशीबाचीच गोष्ट आहे. त्या बाबतीत तो भाग्यवान आहे असंच म्हणावं लागेल. त्याने यातून (माझ्याकडून) बरंच काही शिकलं असेल अशी मी आशा करतो. त्याला मिळणाऱ्या संधी आणि इतरांच्या त्याच्यावर खिळलेल्या नजरा याबाबतीतही तो बराच भाग्यवान आहे असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे अनेकांचं लक्ष लागून राहणं स्वाभाविक आहे. त्याने या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा.’ असं शाहिद म्हणाला होता.