बऱ्याच कलाकारांची मुलं त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत चित्रपटसृष्टीतच करिअर करण्याला प्राधान्य देतात. अभिनेत्री श्रीदेवीच्या मुलीने म्हणजेच जान्हवी कपूरनेही याच मार्गाची निवड करत त्यासाठीची तयारीही सुरु केली. निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘सैराट’ (हिंदी) चित्रपटातून ती झळकणार असल्याच्या चर्चा आहेत. किंबहुना त्यासाठीची तयारीही शेवटच्या टप्प्यात आली आहे. पण, आपल्या मुलीच्या पदार्पणापूर्वी श्रीदेवी करणवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर मराठी चित्रपटाचा रिमेक करण्यासाठी करण पुढे सरसावला खरा. पण, त्याने अद्यापही या चित्रपटाची अधिकृत घोषणा केली नाही. चित्रपटाची घोषणा करण्यात तो करत असलेली चालढकल श्रीदेवीला रुचलेली नाही. त्यामुळेच ती करणवर नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ‘डीएनए’मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार करणने एव्हाना ‘सैराट’च्या हिंदी रिमेकची घोषणा करणे अपेक्षित होते. पण, त्याने तसे काहीच केले नसल्यामुळे श्रीदेवीनी नाराजी व्यक्त केली आहे.

वाचा : बॉलिवूडमध्येही लैंगिक छळ होतो- प्रियांका चोप्रा

करण जोहर त्याच्या चित्रपटांची घोषणा करण्यात कधीच इतकी दिरंगाई करत नाही. त्यातही काही दिवसांपूर्वी त्याने ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘केसरी’ या दोन बिग बजेट चित्रपटांची घोषणा केली. त्यामुळे तगडी स्टारकास्ट असणाऱ्या या दोन्ही चित्रपटांची घोषणा होऊनही ‘सैराट’चा हिंदी रिमेक पिछाडीवर का पडला, हाच प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यातही जान्हवी कपूर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्यामुळे एक आई म्हणून श्रीदेवीला तिच्या पदार्पणाची काळजी वाटणे स्वाभाविकच आहे. तेव्हा आता तिची नाराजी दूर करण्यासाठी करण ‘सैराट’च्या हिंदी रिमेकची घोषणा करणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.