‘सैराट’ या चित्रपटाच्या यशात दिग्दर्शन, कलाकारांचा अभिनय या गोष्टी जितक्या महत्त्वाच्या भूमिका निभावून गेल्या तितकीच महत्त्वाची भूमिका या चित्रपटाच्या संगीतानेही निभावली. अजय-अतुल या संगीतकार जोडीने नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाला अफलातून संगीत दिले होते. हॉलिवूड स्टुडिओजमध्ये ‘सैराट’च्या पार्श्वसंगीताची धुन तयार करण्यात आली होती. या चित्रपटाच्या संगीतात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलाकारांचे योगदानही प्रेक्षकांची दाद मिळवून गेले. हीच जादू पुन्हा अनुभवता येण्याची चिन्हे आहेत. कारण, ‘सैराट’चा हिंदी रिमेक असणाऱ्या ‘धडक’ या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारीसुद्धा याच संगीतकार जोडीच्या खांद्यावर देण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरीही ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘धडक’चा निर्माता करण जोहर यानेच अजय-अतुलची निवड करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते. यामुळे आता ‘धडक’मध्येही ‘झिंगाट’सारखे एखादे गाणे असणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ‘सैराट’प्रमाणेच धडकमध्येही अजय-अतुलच्या संगीताची जादू व्हावी अशी करणची अपेक्षा आहे.

https://www.instagram.com/p/BbmP5AIhzf2/

Dhadak photos: बॉलिवूडमधील आर्ची-परश्या…

‘सैराट’च्या हिंदी रिमेकमधून अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खत्तर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ‘धडक’मध्ये त्यांचा लूक कसा असेल, यावरुन पडदा उचलण्यात आला होता. शशांक खैतान दिग्दर्शित या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानच्या खेड्यातील एका प्रेमी युगुलावर आधारित असल्याचे म्हटले जातेय. सध्या या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचे वातावरण तयार करण्यात ‘धडक’ची टीम यशस्वी झाली असून, आता प्रेक्षकांना ६ जुलै २०१८ या तारखेचीच प्रतिक्षा लागून राहिली आहे, कारण याच दिवशी हिंदीतील हे ‘आर्ची’ आणि ‘परश्या’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.