एकीकडे दिवसेंदिवस करोना व्हायरसचा फैलाव वाढत चालला असल्याने अनेकजण काळजी घेत आहेत. तर दुसरीकडे आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी चाहत्यांची चित्रपटगृहाबाहेर तुफान गर्दी केली आहे. चित्रपटगृहाबाहेरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. करोना काळात चित्रपटगृहाबाहेरील गर्दी पाहून चिंता व्यक्त केली जात आहे.

विशाखापट्टणममधील एका चित्रपटगृहामध्ये तेलुगू सुपरस्टार आणि राजकारणात प्रवेश करणारा अभिनेता पवन कल्याणचा आगामी चित्रपट ‘वकील साब’चा ट्रेलर लाँच करण्यात आला. पवन कल्याणच्या चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर अलोट गर्दी केली. तेथे चेंगराचेंगरीचे वातावरण दिसू लागले. चित्रपटगृहामध्ये ट्रेलर पाहण्यासाठी चाहत्यांची धडपड सुरु होती. काहींनी चित्रपटगृहाच्या खिडक्या तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.

‘वकील साब’ या चित्रपटाचा ट्रेलर चार वाजता प्रदर्शित होणार होता. त्यामुळे चाहत्यांनी दुपारी दोन वाजल्यापासून चित्रपटगृहाबाहेर गर्दी करण्यास सुरुवात केली. चाहत्यांनी पवन कल्याणचा फोटो ठेवून तेथे पूजा केल्याचे देखील म्हटले जात आहे. चाहत्यांनी गर्दी केल्यामुळे तेथील रस्ता देखील जाम होता.

गेल्या काही दिवसांपासून पवन कल्याण चित्रपटसृष्टीपासून लांब होता. तो ‘वकील साब’ या चित्रपटाच्या माध्यामातून पुनरागम करत आहे. त्यामुळे होळीच्या मुहुर्तावर या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. ‘वकील साब’ हा चित्रपट बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘पिंक’ चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट ९ एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.