बॉलिवूडचा एकमेव खिलाडी अक्षय कुमारचा रुस्तम येत्या शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. त्याच दिवशी १२ ऑगस्टला आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित हृतिक रोशनचा ‘मोहेंजोदारो’ हा सिनेमाही प्रदर्शित होत आहे.
सिनेमागृहात अक्षय विरुद्ध हृतिक अशी लढत असताना कोणाचा सिनेमा जास्त गल्ला करेल हे तर येणारा शुक्रवारच ठरवेल. पण बॉलिवूडच्या ‘सुलतान’ने मात्र त्याच्या चाहत्यांना अक्षयचा ‘रुस्तम’ बघण्याचा सल्ला दिला.
त्याने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यात तो आपल्या चाहत्यांना रुस्तम बघण्याचे आवाहन करत आहे. ‘१२ ऑगस्टला बॉलिवूडच्या रुस्तम हिंदचा सिनेमा येतोय. या सिनेमाचे नाव आहे रुस्तम. तुम्ही हा सिनेमा नक्की पाहा.’ अशी पोस्ट त्याने ट्विटरवर केली आहे. सलमानने यापूर्वी ‘जान-ए-मन’, ‘मुझसे शादी करोगे’ या सिनेमांमध्ये अक्षयबरोबर काम केले होते.
मुंबईतील गाजलेल्या नानावटी प्रकरणावर ‘रुस्तम’ या चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटात अक्षयच्या भूमिकेचं नाव रुस्तम पावरी असून, रुस्तमवर विक्रम मखिजा या पत्नीच्या प्रियकराच्या हत्येचा आरोप असतो. विक्रम मखिजाच्या हत्याप्रकरणाला मिळणारे रंजक वळण, चौकशीचा ससेमिरा आणि भावनेची लाट यावर चित्रपटाचे कथानक अवलंबून आहे. चित्रपटात अक्षयच्या पत्नीची भूमिका इलियाना डिक्रूझ साकारत आहे. याशिवाय चित्रपटात सचिन खेडेकर, एशा गुप्ता, उषा नाडकर्णी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Story img Loader