मराठी चित्रपटवगळता सध्या काही विशेष सुरु आहे?
सचिन – होय, मी सध्या आंध्र प्रदेशचे तीनदा मुख्यमंत्री राहिलेल्या एन. टी. रामाराव यांच्या आयुष्यावरील चरित्रपटात भूमिका साकारतोय. हा तेलगू भाषिक चित्रपट आहे. अलिकडे दक्षिणेकडील काही चित्रपट एकाच वेळेस तेलगू, तमिळ, मल्याळम आणि हिंदी अशा चार भाषांत डब होत प्रदर्शित झालेत, तसे कदाचित या चित्रपटाचे होईलही. त्याची काही कल्पना नाही. अर्थात तेथील एका भाषेतील चित्रपट इतर भाषांमध्ये डब होतात. दक्षिणेकडील प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात भूमिका साकारल्याचा माझा अनुभव चांगला आहे. तिकडचे तीन चार चित्रपट मी केले असतील.
या चित्रपटातील तुझी व्यक्तिरेखा?
सचिन – खूप इंटरेस्टिंग आहे, एनटीआर यांच्या विरोधात बंड करून मुख्यमंत्री पद पटकावलेले आणि मग एनटीआर यांनी बाजी उलटवलेले राजकीय नेते भास्करराव ही व्यक्तिरेखा मी यात साकारतोय. ही भूमिका साकारण्यासाठी काही महत्त्वाचे संदर्भ आणि छायाचित्रे मला दिली गेलीत, त्यांचे निरीक्षण, अभ्यास, वाचन मी करतोय. त्याशिवाय ही व्यक्तिरेखा सापडणार नाही. पण या चित्रपटातील ही व्यक्तिरेखा देखील महत्त्वाची आहे.
दक्षिणेकडील प्रादेशिक चित्रपटात भूमिका करताना प्रेक्षकांचा काही अनुभव?
सचिन – होय तर, मी भूमिका केलेल्या ‘सुर्या’ या तिकडच्या आघाडीच्या नायकाच्या एका चित्रपटाची हिंदीत डब आवृत्ती उपग्रह वाहिनीवर दाखवली गेली होती, मी एकदा नेपाळला गेलो असता मला नेमके त्याच चित्रपटातील संदर्भावरुन ओळखले. मराठी-हिंदी चित्रपटातील भूमिकेसाठी अनेकदा अॅप्रिसिएशन मिळत असतेच.
‘टेक केअर गुड नाईट’ या मराठी चित्रपटाचे स्वरुप काय? याशिवाय आणखी काही मराठी चित्रपट?
सचिन – हा ‘सायबर क्राईम’ विषयावरचा आणि महत्वाचे म्हणजे आजच्या पिढीचा, आजच्या काळातील चित्रपट आहे. यात पालक आणि पाल्य यांच्या नातेसंबंधांचीही गोष्ट आहे. सध्या तरी माझा हा एकच मराठी चित्रपट असून प्रेक्षकांच्या प्रतिसादाकडे माझे लक्ष आहे. तसेच काही विशेष करण्यासारखे असेल तर नवीन चित्रपट स्वीकारावा असे वाटते.
दिलीप ठाकूर