प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल आणि नव्याने आयुष्यावर प्रेम करायला शिकवेल असा ‘लव्ह यु जिंदगी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. एस. पी. प्रोडक्शन्स निर्मित आणि मनोज सावंत दिग्दर्शित ‘लव्ह यु जिंदगी’ मध्ये अभिनेते सचिन पिळगांवकर महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. विशेष म्हणजे पहिल्यांदाच अभिनेत्री प्रार्थना बेहरे सचिन पिळगांवकर यांच्यासोबत दिसणार आहे.
या चित्रपटात सचिन पिळगांवकर अनिरुध्द बाळकृष्ण दाते या एका सामान्य गृहस्थाच्या भूमिकेत दिसणार आहे. आयुष्यातील खरा आनंद म्हणजे तारुण्य मानणाऱ्या अनिरुध्द दातेची पुन्हा एकदा नव्यानं आयुष्य जगण्याची धडपड सुरू होते. त्याचा हा प्रवास ‘लव्ह यु जिंदगी’ मधून उलगडत जाणार आहे. यानिमित्तानं प्रार्थना बेहरे देखील पहिल्यांदाच सचिन पिळगावकर यांच्यासोबत काम करत आहे.‘लव्ह यु जिंदगी’ मधील कूल आणि स्टायलिश लूकमधून प्रार्थना तिच्या चाहत्यांना एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटातून सचिनजींनी साकारलेल्या अनिरुध्द दातेच्या आयुष्यातील गंमती जमती अनुभवायला मिळतील आणि त्याचसोबत प्रार्थनाचा पुन्हा एकदा नटखट स्वभाव देखील पाहायला मिळणार आहे. सचिन बामगुडे निर्मित ‘लव्ह यु जिंदगी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह मनोज सावंत यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून येत्या १४ डिसेंबरला आयुष्यावर नव्याने प्रेम करायला लावणारा ‘लव्ह यु जिंदगी’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.